Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शरद पवारांच्या भेटीला, अजितदादा आणि त्यांचे सर्व आमदार; या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांच्या भेटीला, अजितदादा आणि त्यांचे सर्व आमदार; या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ 



मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सुरु असलेले धक्कातंत्राचे राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट फोडून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटत लढाईच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांमधील राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या घडामोडींविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण अजित पवार आणि त्यांच्या गटाचे आमदार सोमवारी दुपारी शरद पवार यांच्या भेटीसाठी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले असल्याने एकचं खळबळ उडाली आहे. कालदेखील अजित पवार आणि त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार आपल्या गटाचे सर्व आमदार सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. काल अजित पवार गटाचे नेते न सांगता शरद पवार यांच्या भेटीला आले होते. मात्र, आज अजित पवार हे आधी वेळ घेऊन शरद पवार यांच्या भेटीला आल्याची माहिती आहे. शरद पवार काहीवेळापूर्वीच सिल्व्हर ओकवरुन निधून यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी शरद पवार गटाचे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडही उपस्थित राहणार आहेत. आता याठिकाणी बैठकीला सुरुवात झाली असून त्यामधून काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल.

कालदेखील अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाचे नऊ मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. मात्र, त्यावेळी अजित पवार गटाने शरद पवारांच्या भेटीची वेळ घेतली नव्हती. त्यावेळी काही मिनिटे चर्चा केल्यानंतर अजित पवारांचा गट बाहेर आला होता. या भेटीत अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहण्यासाठी शरद पवारांना आपल्यासोबत सरकारमध्ये सामील होण्याची विनंती केली होती. मात्र, शरद पवार यांनी हा प्रस्ताव नाकारल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहण्यासाठी तुम्ही काहीतरी मार्ग काढा, असेही अजितदादांच्या गटाने म्हटले होते. यावर शरद पवार यांनी कोणताही कौल दिला नव्हता. त्यानंतर पुन्हा एकदा अजितदादांचा गट शरद पवार यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात त्याचे निरनिराळे अर्थ काढले जात आहेत.
Previous Post Next Post