गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
स्थानिक गुन्हे शाखेकडून आठ महिन्यापासून फरार असणाऱ्या दरोड्यातील आरोपीला अटक
याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक 12/10/2022 रोजीच्या मध्यरात्री पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतील कातपुर शिवारातील एका व्यवसायिकाच्या घरात अज्ञात आरोपींनी प्रवेश करून त्याच्याकडील अग्निशास्त्र व चाकूचा धाक दाखवून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 कोटी 98 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून घेऊन गेले आहे. अशा तक्रारीवरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे CR no 589 / 2022 कलम 395, 397 भारतीय दंड विधान संहिता तसेच कलम 25, 3, 4 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा तपास करून लातूर पोलिसांनी अवघ्या दहा दिवसात गुन्ह्यातील आरोपींना लातूर, पुणे, जालना या विविध ठिकाणाहून अटक करून त्यांनी दरोड्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व दरोड्याचा कट करणारा सराईत गुन्हेगार विजय गायकवाड हा गुन्हा करून फरार झाला होता. आठ महिन्यापासून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके विजय गायकवाडचा शोध घेत होते परंतु तो सतत राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने मिळून येत नव्हता. दरोड्याचा मुख्य सूत्रधार विजय गायकवाडला अटक करणे बाबत पोलीस अधिक्षक श्री. सोमय मुंडे ,अपर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली स्थागुशा येथील पोलीस अधिकारी व अमलदारांचे विशेष पथक आरोपी शोधकामी विविध ठिकाणी पाठविण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्या करिता पथकांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करत होते. सदर पथके आरोपीचे शोध कामी वेगवेगळया ठिकाणी रवाना केले. त्यादरम्यान दि.09/07/2023 रोजी आरोपी विजय गायकवाड हा 60 फुटी रोड येथील अबुलकलाम चौक येथे थांबलेला असल्याची गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली,त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फरार आरोपी विजय बब्रुवान गायकवाड, वय 43 वर्ष, राहणार बौद्ध नगर, लातूर यास दरोड्याच्या गुन्हयात ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
विजय गायकवाड याचेवर लातूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाणेला मारामारी, खून करण्याचा प्रयत्न, जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरून निष्पन्न होते.
सदर पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र परिश्रम करून,बातमीदार तयार करून अतिशय कुशलतेने माहिती मिळवून आरोपीस अटक केली आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक काळगे ,पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे ,तुराब पठाण, राजू मस्के, संतोष खांडेकर, नितीन कटारे, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.