गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
‘कॉपी’वर चालणार्या महाविद्यालयात पाल्यास प्रवेश देऊन त्यांना बौध्दिक अपंग बनवू नका
माजी शिक्षण उपसंचालक ठाकरेंचे आवाहन
लातूर, दि. २१ -अकरावी व बारावीच्या वर्गात प्रवेश देऊन विद्यार्थ्याला चांगले गुण मिळवून देण्याची हमी देत पालकांकडून मनमानी शुल्क उकळणार्या शिक्षण संस्थांचे पेव लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढले आहे. शहरातील महाविद्यालयांत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ‘कॉपी’वर चालणार्या महाविद्यालयात पाल्यास प्रवेश देऊन त्यांना बौध्दिक अपंग बनवून त्यांचे आयुष्य उध्वस्त करू नका, असे आवाहन माजी शिक्षण उपसंचालक डॉ. अरुण ठाकरे यांनी केले आहे.
सध्या जिल्ह्यात अकरावीच्या सर्व विद्याशाखांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. शहरातील नामांकीत महाविद्यालयात प्रवेश घेण्याऐवजी पालकांचा व विद्यार्थ्यांचा कल हा ग्रामीण भागातील कोणत्याही सुविधा नसलेल्या परंतु कॉपी सेंटर आहे म्हणून त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा हा ट्रेंड पहावयास मिळत आहे. याचा अर्थ पालकच आपल्या पाल्याचे भविष्य अंधारात ढकलून त्याला बौद्धिक अपंग करीत आहेत. शहरातील काही तथाकथित काही शिकवण्यांचे संचालकही विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश घ्या, तरच आमच्या शिकवणीला प्रवेश मिळेल, असे सांगत आहेत. शहरातील महाविद्यालयात प्रॅक्टिकलला गुण देत नाहीत व परीक्षा कडक होते, असे खासगी शिकवणीवाले विद्यार्थी पव पालकांना सांगतात. मात्र, तसे काही नाही. वास्तविक पाहता बारावीच्या गुणांना महत्त्व नाही. कारण ‘सीईटी’ व ‘नीट’ या परीक्षेला विद्यार्थ्यांना गुण मिळाले तरच इंजिनिअरिंग व मेडिकलला प्रवेश मिळतो, हे पालक व विद्यार्थी विसरून आपले भविष्य अंधारात स्वतःच ढकलत आहेत. शहरातील महाविद्यालयांमध्य सर्व सुविधा असूनही ह्या षडयंत्रामुळे शहरातील महाविद्यालयांची विद्यार्थी संख्या घटत चालली आहे, हे दुर्दैवच म्हणता येईल. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन आपल्या पाल्यांना बौध्दिक अपंगत्त्व आणून त्यांचे भविष्य उध्वस्त करु नका, असे आवाहन माजी शिक्षण उपसंचालक डॉ. ठाकरे यांनी केले आहे.