गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
देशातील आमदारांकडे ५४,५४५ कोटी रुपयांची संपत्ती
एडीएआर या स्वयंसेवी संस्थेने आमदारांच्या निवडणूकपूर्व शपथपत्रांच्या आधारे संपत्तीचे विश्लेषण करून एक अहवाल तयार केला आहे. या अहवालामधून आमदारांच्या संपत्तीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये २८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ४०३३ पैकी ४००१ आमदारांचा समावेश आहे. या अहवालानुसार, देशातील सुमारे ४ हजार आमदारांकडे एकूण ५४,५४५ कोटींची संपत्ती आहे. एका आमदाराची सरासरी मालमत्ता १३.६३ कोटी रुपये आहे.
विशेष म्हणजे हा आकडा नागालँड, मिझोराम आणि सिक्कीमच्या २०२३-२४ च्या एकूण बजेटपेक्षा ही जास्त आहे. एका अहवालानुसार या राज्यांचे एकत्रित वार्षिक बजेट ४९,१०३ कोटी रुपये आहे. नागालँडचे २०२३-२४ या वर्षाचे बजेट २३,०८६ कोटी रुपये, मिझोरामचे बजेट १४,२१० कोटी रुपये आणि सिक्कीमचे बजेट ११,८०७ कोटी रुपये आहे.
हे आमदार ८४ राजकीय पक्षांचे असून त्यात अपक्षांचाही समावेश आहे. कर्नाटकातील काँग्रेस आमदार आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे १,४१३ कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. अपक्ष ९५ आमदारांकडे एकूण २,८४५ कोटी रुपये आहेत. भाजपच्या १,३५६ आमदारांची संपत्ती १६,२३४ कोटी आणि काँग्रेसच्या ७१९ आमदारांची संपत्ती १५,७९८ कोटी आहे. एकूण संपत्तीमध्ये या दोन प्रमुख पक्षांच्या आमदारांचा एकूण वाटा ५८.७३% आहे.
तसेच उत्तर प्रदेश मधील (४०३) आमदारांची एकूण संपत्ती ३,२५५ कोटी रुपये, गुजरात (१८२) २,९८७ कोटी रुपये, तामिळनाडू (२२४) २,७६७ कोटी रुपये आणि मध्य प्रदेश (२३०) २,४७६ कोटी रुपये आणि मणिपूर (६०) मध्ये आमदारांची संपत्ती २२५ कोटी रुपये आहे.
सरासरी संपत्ती
वायएसआरसीपीच्या आमदारांची सरासरी संपत्ती २३.१४ कोटी रुपये, भाजपच्या १३५६ आमदारांची सरासरी मालमत्ता ११.९७ कोटी रुपये, काँग्रेसच्या ७१९ आमदारांची सरासरी संपत्ती २१.९७ कोटी रुपये, तृणमूल काँग्रेसच्या २२७ आमदारांची सरासरी मालमत्ता ३ कोटी रुपये आहे. आम आदमी पक्षाच्या १६१ आमदारांची सरासरी संपत्ती १०.२० कोटी रुपये आणि युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीच्या १४६ आमदारांची २३.१४ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्राच्या आमदारांची मालमत्ता
अहवालानुसार, महाराष्ट्रात (२८८ पैकी २८४) ६,६७९ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. आंध्र प्रदेश (१७५ पैकी १७४) कडे ४,९१४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे तर कर्नाटकच्या आमदारांची एकूण संपत्ती १४,३५९ कोटी रुपये आहे.
Tags:
Crime News