ग्रामीण भागातील मुलींच्या हॉकी संघाला "माझं लातूर" परिवाराचा आधार
पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते खेळाडूंना हॉकी स्टिक प्रदान....
लातूर : लातूर तालुक्यातील बिंदगीहाळ येथील हनुमान विद्यालयाच्या शालेय मुलींच्या हॉकी संघास माझं लातूर परिवाराच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते हॉकी स्टिकचे वितरण करण्यात आले. पोलिस अधिक्षक कार्यालयात संपन्न झालेल्या सोहळ्यात हनुमान विद्यालयाचा शालेय मुलींचा संपुर्ण हॉकी संघ, माझं लातूर परिवाराचे मुख्य संयोजक सतीश तांदळे, शाळेचे मुख्याध्यापक आर आर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी माझं लातूर परिवाराने हा उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वीही २०१७ साली तत्कालीन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते खेळाडूंना हॉकी प्रदान करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत या शाळेतील २ मुलींनी राष्ट्रीय पातळीवर तर तब्बल २०० च्या वर मुलींनी राज्यस्तरावर लातूरचे प्रतिनिधित्व केले आहे. नांदेड येथे होत असलेल्या विभागीय ज्युनिअर नेहरू हॉकी स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरला असून या सर्व खेळाडूंना मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी माझं लातूर परिवाराचे काकासाहेब शिंदे, रत्नाकर निलंगेकर, संजय स्वामी, किशोर जैन, गोपाळ झंवर, सचिन सोळुंके, जुगलकिशोर तोष्णीवाल, शेरखाने सर यांची उपस्थिती होती.