Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

‘मराठवाडा मुक्तिगाथा : लातूर जिल्हा’ स्मृतीग्रंथाचे प्रकाशन

‘मराठवाडा मुक्तिगाथा : लातूर जिल्हा’ स्मृतीग्रंथाचे प्रकाशन


लातूर, दि. 16 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान ‘अमृत महोत्सव सप्ताह’चे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप रविवारी (दि. 17) देशभक्तीपर गीतांनी आणि ‘मराठवाडा मुक्तिगाथा : लातूर जिल्हा’ या स्मृतीग्रंथाच्या प्रकाशनाने होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, इतिहास संशोधक डॉ. सोमनाथ रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा स्मारक येथे सायंकाळी 5.30 वाजता या ग्रंथाचे प्रकाशन होईल.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची यावेळी उपस्थिती राहील.

मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये लातूर जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात महत्वपूर्ण कामगिरी बजाविली. अनेकांना यामध्ये हौतात्म्य आले. काहींना कठोर शिक्षा झाल्या. आजचा लातूर जिल्ह्याचा भाग असलेल्या परिसरात निजामाचे पोलीस, रझाकार यांच्याविरुद्ध किसान दल, सर्वसामान्य यांनी लढे दिले. यासोबतच महाराष्ट्र परिषदेचे महत्वाचे दुसरे अधिवेशन 1938 साली लातूरमध्येच झाले. यासारख्या अनेक महत्वपूर्ण घटना लातूर आणि परिसरात घडल्या. पूर्वी हा उस्मानाबाद जिल्ह्याचा भाग असल्याने याबाबतच्या स्वतंत्र नोंदी उपलब्ध नाहीत. त्यामुळे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये लातूर जिल्ह्यात लढल्या गेलेल्या मुक्तिसंग्रामाचा ऐतिहासिक ठेवा शब्दरूपात एकत्रित करण्यासाठी ‘मराठवाडा मुक्तिगाथा : लातूर जिल्हा’ हा स्मृतीग्रंथ जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रकाशित केला जात आहे.

ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, इतिहास संशोधक डॉ. सोमनाथ रोडे हे या ग्रंथाचे संपादकीय सल्लागार असून इतिहास अभ्यासक डॉ. सुनील पुरी, भाऊसाहेब उमाटे, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, इतिहास संशोधक विवेक सौताडेकर, डॉ. अर्चना टाक यांचा संपादकीय मंडळात समावेश होता. संपादकीय मंडळातील सदस्यांसह सनदी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, डॉ. एस. बी. दंदे, प्रा. डॉ. अश्विनी रोडे, डॉ. शिवराज बोकडे, डॉ. भूषण जोरगुलवार, डॉ. ओमशिवा लिगाडे, डॉ. प्रभा वाडकर यांच्या लेखाचा या ग्रंथात समावेश आहे. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Previous Post Next Post