मराठा आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यात शैक्षणिक बंद मराठा क्रांतीचा निर्णय, शाळा-महाविद्यालयांना केले अवगत
कोणत्याही अटी शर्ती न घालता मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी (दि.९) लातूर शहर व जिल्हयात शैक्षणिक बंद करण्यात येणार आहे. बुधवारी रात्री मोर्चाच्या वतीने येथे घेण्यात आलेल्या व्यापक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या उपोषण पार्श्वभूमिवर आरक्षणाबाबत समाजाची मते आजमावण्यासाठी व लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजबांधवानी आपापली मते मांडली. सरकार ज्यांच्याकडे निजामकालीन पुरावे असतील त्याच मराठयांना कुणबी जातीचा दाखला देणार असल्याचे सांगत आहे तथापि हे योग्य व आपणास मान्य नसून सर्व मराठ्यांना ते सरसकट देण्यात यावे , असा ठरावच या बैठकीत घेण्यात आला. निजाम राजवटीत अनेकांनी अशा नोंदी केल्या नाहीत मराठा समाजातील ज्या कोणी केल्या असतील त्या सर्व समाजासाठी ग्राह्य मानणे न्यायाचे होईल त्यामुळे सरकारने आता वेळकाढूपणा व धरसोड वृत्ती टाळावी व सरसकट मराठयांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे असे सर्वांनीच सांगितले. दरम्यान या मागणीकडे लक्ष वेधून ती मार्गी लावण्यासाठी आंदोलनाचा एक भाग म्हणून शैक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी- पालकांना त्रास व शाळा व्यवस्थापनाची कसरत होऊ नये म्हणून या नियोजीत बंद बाबत गुरुवारी शहरातील सर्व शाळा-महाविद्यालयाना तसेच विद्यार्थी वाहतुक संघटनेस पत्र देण्यात आली असून बंदसाठी सहकार्य करावे व या दिवशी चाचणी अथवा तत्सम परीक्षा असल्यास त्या पुढे ढकलाव्यात अशी विनंती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
................
मराठा आरक्षण मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत असून बुधवारी आदित्य देशमुख व सतिश कारंडे यांच्या उपोषणाने त्यास सुरुवात झाली आहे. पुढे मराठा समाजातील युवक त्यात साखळीपध्दतीने सामिल होतील. तालुका स्तरावरही अशी उषोषणे होत आहेत.