कौशल्या अकॅडमीच्या वतीने लातुरात धियः प्रचोदयान् कार्यशाळा : वैशाली देशमुख
लातूर : कौशल्या अकॅडमी लातूरच्या वतीने रविवार, दि. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी धियः प्रचोदयन् कार्यशाळा व अग्रसंधनी दैनंदिनी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अकॅडमीच्या संचालिका वैशाली देशमुख यांनी शुक्रवारी लातुरात पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
विद्यार्थ्यांमध्ये स्वयंप्रेरणा आणि स्वयंशिस्त रुजविण्याकामी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या सर्वच शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगून वैशाली देशमुख पुढे म्हणाल्या की, रविवारी सकाळी ११ वाजता पडिले लॉन्स या ठिकाणी होणाऱ्या या नाविन्यपूर्ण कार्यशाळेसाठी १५० हून अधिक शाळांचे प्राचार्य - मुख्याध्यापक आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहणार आहेत. यावेळी खास विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक पध्दतीने तयार केलेल्या व वैदिक अभ्यास पध्दतीने प्रेरित असलेल्या अग्रसंधनी दैनंदिनीचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. या कार्यशाळेसाठी आ. अभिमन्यू पवार, आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पुण्याच्या एम.ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजच्या एचओडी डॉ. श्रीमती रेणुका नागराळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
लहान मुलांवर अगदी लहानपणांपासून स्वच्छतेसह अनेक बाबींची शिस्त लावणे त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असते. चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यार्थ्याला नेमके कसे शिकवणे, समजावणे आवश्यक आहे, हे महत्वाचे असते. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला शिकवलेले अंगवळणी पडले तरच त्या शिक्षणाला अर्थ राहणार आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता अंबाजोगाई रोडवरील साळाई मंगल कार्यालयाजवळील पडिले लॉन्स या ठिकाणी ही कार्यशाळा व अग्रसंधनी दैनंदिनीचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असल्याचे वैशाली देशमुख यांनी सांगितले.
याप्रसंगी कौशल्या अकॅडमीचे संचालक विजय केंद्रे, प्रा. श्रीपाद कुसनूरकर, प्रा. चंद्रकांत विभूते आदी मान्यवरांची उपस्थिती होती.