Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

धियः प्रचोदयन् कार्यशाळेमुळे शिक्षकांसह विद्यार्थीही शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण होतील : आ. अभिमन्यू पवार

धियः प्रचोदयन् कार्यशाळेमुळे शिक्षकांसह विद्यार्थीही 
 शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण होतील : आ. अभिमन्यू पवार 







लातूर : शास्त्रीय तसेच वैज्ञानिक बाबींचा अंगिकार करून आयोजित करण्यात आलेल्या धियः प्रचोदयन् कार्यशाळेमुळे शिक्षकांसह विद्यार्थीही शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण होतील असा विश्वास आ. अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला.    
            लातूर येथील कौशल्या अकॅडमीच्या वतीने रविवारी सकाळी अंबाजोगाई रोडवरील साळाई मंगल कार्यालयाजवळील पडिले लॉन्स या ठिकाणी धियः प्रचोदयन् कार्यशाळा व अग्रसंधनी दैनंदिनी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून आ. अभिमन्यू पवार मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी पुण्याच्या एम.ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजच्या एचओडी डॉ. श्रीमती रेणुका नागराळे, लातूरच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, भाजपाचे जिल्हा संघटक संतोष मुक्ता, श्वेता लोंढे, कौशल्या अकॅडमीच्या वैशाली देशमुख, विजय केंद्रे, प्रा. श्रीपाद कुसनूरकर, विपश्यना निटुरे, प्रा. चंद्रकांत विभुते, संदीप शेळके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी बोलताना आ. अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांप्रती समयसूचकता अत्यंत व्यवस्थितरीत्या घेण्याचे काम कौशल्या अकॅडमीकडून सर्वज्ञात आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून ज्या संकल्पना मांडण्यात आल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे सर्वात प्रभावी माध्यम शिक्षक हेच आहे. म्हणून या कार्यशाळेत प्राचार्य - शिक्षक वृंदांना पाचारण करण्यात आले आहे. प्रत्येक लहान बालकाची पहिली गुरु त्याचे आई असते. आजघडीला सगळीकडे लातूर पॅटर्नचा गवगवा केला जातो. आपण मात्र, या लातूर पॅटर्नपेक्षा लहान मुलांना घडविणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करतो. कारण या लहान मुलांना घडवून परिपक्व केल्यानेच हा पॅटर्न उदयास येऊ शकला आहे, हे महत्वपूर्ण आहे. आपण स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आहोत. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी आपल्या मतदार संघात सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. जी गोष्ट कौशल्या अकॅडमी मध्ये शिकवली जाते, तीच जिल्हा परिषदेच्याही शाळेत शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सद्यस्थितीतील शिक्षक व पूर्वीचा शिक्षा यात आता खूप फरक आहे. पूर्वीचे शिक्षक नियमित अध्ययनासोबतच अधिकचे वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्यासाठी धडपडत असत. शिक्षकांनी प्रेरणा कोणाकडून का मिळेना, ती घेऊन कायम शिकत राहिले पाहिजे. अशा प्रकारच्या अभिनव कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल आ. पवार यांनी वैशाली देशमुख व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले.  
    डॉ. रेणुका नागराळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अग्रसंधनी दैनंदिनीच्या माध्यमातून लुप्त होत जाणारी भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न वैशाली देशमुख यांनी अत्यंत प्रभावीपणे केल्याचे सांगितले. स्वयंशिस्तीचा अवलंब केल्यास प्रत्येकाच्या मनातील आशा - आकांक्षा पूर्ण होण्याकामी काहीही अडचण येणार नसल्याची बाब यावरून निदर्शनास येते. लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात, याबाबत त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबतीतील एक गोष्ट सांगून मोठ्यांचे अनुकरण करण्यासाठीचे प्रयत्न मुलांकडून कसा होतो हे नमूद केले. उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेचे विस्तृत असे प्रास्तविक वैशाली देशमुख यांनी केले. या कार्यशाळेची संकल्पना आपणास कशी सुचली यापासून ते अग्रसंधनी दैनंदिनीच्या उत्पत्तीची शास्त्रोक्त माहिती त्यांनी दिली. शिक्षकांना वर्गात सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांबाबत माहिती देऊन त्यांनी विद्यार्थी कसा असावा ? यासंदर्भातील गुरु द्रोणाचार्य व युधिष्ठिर यांचा एक पौराणिक किस्साही त्यांनी कथन केला. सध्या अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर अधिक भर दिला जात असल्याचे दिसून येते. पण विद्यार्थ्यांना जे काही शिकवले गेले आहे, ते समजलेय का, अंगवळणी पडलेय का हे पाहिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुले स्वतःच्या चुका कबूल करत नाहीत. अशा परिस्थितीत अभ्यासातील चुकाही कबूल करत नसतात असे सांगून त्यांनी अग्रसंधनी दैनंदिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे परिपूर्ण केले जाऊ शकते याचे विवेचन केले.  
 कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी सूळ यांनी केले. कार्यशाळेस अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
Previous Post Next Post