लातुरात मध्ये दिवाळी मेळ्याचे आयोजन - एड. शुभदा रेड्डी - नीता अग्रवाल यांची माहिती
लातूर : महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या अगदी टिकली - पिनांपासून ते चक्क मनमोहक पैठणीपर्यंतच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्री असा ' उत्सव मेळा ' शुक्रवार, दि. २७ ते रविवार, दि. २९ ऑक्टोबर या कालावधीत लातुरात पार पडणार असल्याची माहिती येस इव्हेंटच्या मुख्य संयोजिका एड. सौ. शुभदा रेड्डी व सौ. नीता अग्रवाल यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मागच्या सलग नऊ वर्षांपासून महिला उद्योजिकांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आपण एकत्रित येऊन या उपक्रमास येस इव्हेंट असे नाव दिले. आतापर्यंत ३१ मेळे पार पडले असून यावर्षीचा हा ३२ वा दिवाळी मेळा आहे. आपण संक्रांत, श्रावण महिन्यात आणि दिवाळीच्या दरम्यान अशा मेळ्यांचे आयोजन करण्याकामी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर्षीचा हा दिवाळी मेळा सावेवाडीतील शाम मंगल कार्यालयात दि. २७ ते २९ ऑक्टोबर या काळात दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना एड. शुभदा रेड्डी म्हणाल्या की, या माध्यमातून आपण छोट्या - छोट्या, लघुउद्योग करणाऱ्या महिला भगिनींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. यावर्षी आतापर्यंत ९८ स्टॉल ची नोंद झाली असून त्यात भर पडून किमान १०१ स्टॉल होणार आहेत. या मेळ्यात आता केवळ लातूर परिसर आणि जिल्ह्यातीलच महिला भगिनी सहभागी होतात, असे नाही तर मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच शेजारच्या राज्यातूनही महिला उद्योजिका आवर्जून आपला सहभाग नोंदवतात. मेळ्यात सहभागी झाल्यानंतर आपल्याला अगदी माहेरी आल्याचा आनंद मिळतो,असा या महिलांच्या भावना - प्रतिक्रिया असतात,असेही रेड्डी यांनी सांगितले. मेळ्यात सहभागी होणाऱ्या महिला भगिनींना पिण्याच्या पाण्याची सोय आपण आपल्या रेड्डी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून करून देतो असेही त्यांनी सांगितले. या मेळ्यात विविध प्रकारच्या साड्या , पैठणी, ज्वेलरी, फूड स्टॉलसह प्रत्येकाला भावणाऱ्या विविध वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नीता अग्रवाल यांनी यावेळी बोलताना या दिवाळी मेळ्यात गृहसजावटीसाठी लागणाऱ्या सर्व आकर्षक वस्तू, पणत्या, आकाशकंदील, गिफ्ट आयटम, लहान मुलांचे तसेच महिलांचे ड्रेसेसच्या विविध व्हरायटीज उपलब्ध असणार आहेत,असे सांगितले. केवळ फटाके वगळता दिवाळीसाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू या मेळ्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या मेळ्याच्या माध्यमातून लाखोंचा टर्नओव्हर होत असला तरी त्याच्या संपूर्ण लाभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या उद्योजिका घेतात. आपण हा उपक्रम केवळ महिलांना चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी करतो, असे सांगून एड. रेड्डी व अग्रवाल यांनी लातूरकरांनी या मेळ्याचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन केले.