गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
औराद शहाजानी शिवारात बनावट गुटख्याच्या कारखान्यावर धाड;दोन लाखांचा बनावट गुटखा जप्त
अडीच | किलोमीटर चालत जाऊन पहाटे तीन वाजता केली कार्यवाही
लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील अतिदुर्गम भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट गुटख्याच्या कारखान्यावर अडीच किलोमीटर चालत जाऊन गुरूवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धाड टाकून २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी औराद शहाजानीच्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात बनावट गुटखा तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना मिळाली. त्यामुळे मुंडे यांनी त्यांच्या विशेष पथकातील पोलीस उपअधीक्षक अंकिता कणसे, पोलीस अमलदार अनिल जगदाळे, राहुल दरोडे, सचिन चंद्रपाटले, बाळू कांडनगिरे, चालक चव्हाण तसेच निलंगापोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बालाजी सोमवंशी, जीवने यांच्या पथकाने गोपनीय माहिती काढून अत्यंत शिताफीने औराद शहाजानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्गम भागातील झाडीत तयार केलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या बनावट गुटखा कारखान्यावर पहाटे तीन वाजण्याच्या
सुमारास अडीच किलोमीटर पायी चालत जाऊन धाड टाकली. त्यात गुटखा पॅकिंग करण्याची मशीन, वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल तसेच बनावट तयार केलेला विमल पान मसालाच्या गोण्या आदी साहित्य असे एकूण जवळपास २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपी श्रीनिवास गणपतराव शिवणे (वय २७), अभिषेक कालिदास बिराजदार (वय २४ रा. औराद शहाजानी ता. निलंगा) यांच्या विरुद्ध औराद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने अवघड अशा मार्गातून यशस्वी केल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पथकाचे कौतुक केले आहे.