सर्विस रोडवर पार्किंग करणाऱ्यांना मनपाचा इशारा; पार्किंग केल्यास होणार १० हजाराचा दंड
लातूर/प्रतिनिधी: शहरातील रिंग रोड लगत असणाऱ्या सर्विस रोडवर वाहन चालकांनी पार्किंग करू नये.तेथे पार्किंग केल्याचे आढळल्यास मोठ्या वाहनांना १० हजार रुपये तर छोट्या वाहनांना ५ हजार रुपये दंड केला जाईल,असा इशारा मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.
शहरातील राजीव गांधी चौकापासून गरुड चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोड लगत सर्विस रोड तयार करण्यात आला आहे.त्या परिसरातील नागरिकांना सोय व्हावी,हायवेवरील वाहनधारकांना त्रास होऊ नये व अपघात होऊ नयेत यासाठी हायवेच्या बाजूस सर्विस रोड तयार करण्यात आले आहेत. परंतु कांही वाहन चालक या रस्त्यावर आपली वाहने पार्क करत असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे.नागरिकांच्या सुविधेसाठी तयार करण्यात आलेल्या सर्विस रोडचा वापर पार्किंगसाठी केला जात आहे.या रस्त्यावर पार्किंग करू नये,असे निर्देश मनपाने दिले आहेत.यापुढे या सर्विस रोडवर वाहन पार्क केल्याचे आढळले तर ट्रक व इतर मोठ्या वाहनांना १० हजार रुपये आणि छोट्या वाहनांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड केला जाईल,असा इशारा मनपा कडून देण्यात आला आहे.
या परिसरात मोठ्या संख्येने गॅरेज आहेत. चालक नादुरुस्त वाहने याच सर्विस रोडवर उभी करून दुरुस्ती करतात. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.यापुढे रस्त्यावर वाहने उभी करून दुरुस्ती केली जात असल्याचे दिसून आले तर गॅरेज चालकावरही कारवाई केली जाईल, असा इशारा मनपाकडून देण्यात आला आहे.
--