१०६ वर्षांचे ज्येष्ठ समाजसेवक स्वा.सै.हरिश्चंद्र गुरुजी यांचा लातूरमध्ये हृद्य सत्कार
लातूर (प्रतिनिधी) दि.२४-
असंख्य विद्यार्थ्यांना सद्गुणी, निर्व्यसनी, सदाचारी व सुसंस्कार संपन्न बनवून त्यांना मानवी मूल्यांची शिकवण देण्याकरिता आपले आयुष्य वेचणारे १०६ वर्षांचे आजीवन ब्रह्मचारी, ज्येष्ठ समाजसेवक आणि गोवा मुक्ती व हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील वयोवृद्ध स्वा.सै. पूज्य श्री हरिश्चंद्र गुरुजी (स्वामी श्रद्धानंद सरस्वती ) यांचा हृद्य सत्कार समारंभ रविवारी ( २६ नोव्हेंबर) येथील रामनगर आर्य समाज-सभागृहात होत आहे.
पूज्य श्री गुरुजी यांच्या १०७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ भाषावाड्मय अभ्यासक प्रा. ओमप्रकाशजी होळीकर हे भूषवणार असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इतिहासतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते प्रा अर्जुनराव सोमवंशी हे उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या शुभहस्ते श्री गुरुजींचा हृद्य सत्कार केला जाणार आहे . या कार्यक्रमात श्री गुरुजी यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा आढावा ही घेण्यात येईल. सदरील कार्यक्रमास गुरुजींचे विविध क्षेत्रात काम करणारे शिष्यवृंद व स्नेहीजन सहभागी होणार आहेत. तरी या कार्यक्रमास जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे , असे आवाहन राज्य आर्य संघटनेचे अध्यक्ष योगमुनी, सचिव राजेंद्र दिवे, रामनगर लातूर आर्य समाजाचे अध्यक्ष शंकरराव मोरे, सचिव अनंत लोखंडे, कोषाध्यक्ष नागराज चुडमुडे व संयोजन समितीच्या सदस्यांनी केले आहे.