सर्विस रोडवर पार्किंग ;११० वाहनधारकांकडून ७५ हजारांचा दंड वसूल मनपा व वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई
लातूर;प्रतिनिधी: शहराजवळून जाणाऱ्या रिंगरोड लगत सर्व्हिस रोडवर वाहने पार्किंग करू नयेत असे निर्देश असतानाही तेथे वाहने पार्क करणाऱ्या ११० वाहनधारकांवर कारवाई करून ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.मनपाचा अतिक्रमण विभाग व वाहतूक नियंत्रण शाखेने ही कारवाई केली.
रिंगरोड वरून वाहने वेगात जातात.अशा स्थितीत त्या परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे.परंतु गेल्या कांही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात होती.या संदर्भात मनपाने काही दिवसांपूर्वीच निर्देश देऊन सर्व्हिस रोडवर वाहने पार्क केल्यास दंड करण्याचा इशारा दिला होता. तरीदेखील सर्व्हिस रोडवर वाहने पार्क केली जात होती.सोमवारी (दि.६ नोव्हेंबर) मनपाचा अतिक्रमण विभाग व वाहतूक नियंत्रण शाखेने या वाहनधारकांवर कारवाई केली.सर्व्हिस रोडवर उभ्या असणाऱ्या दुचाकी,चार चाकी व ट्रक अशा एकूण ११० वाहनांवर कारवाई करून ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम,पोलीस कर्मचारी तसेच मनपाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख रवी कांबळे, स्वच्छता निरीक्षक सुरेश कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. वाहनधारकांनी सर्व्हिस रोडवर वाहने उभी करू नयेत.यापुढेही मनपा व पोलिसांकडून अशी कारवाई केली जाईल, असा इशारा मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.