अनाथाचे प्रतिपालकत्व समाजाने स्वीकारावे
लातूरच्या एमआयटीत स्वनाथ फाउंडेशनच्या श्रेया भारतीय यांचे प्रतिपादन
लातूर दि.२९ :- देशात आणि जगात अनेक मुले जन्माला येतात पण त्यातील काहीजण अनाथ होतात आई बाबाची वाट पाहणाऱ्या या अनाथ मुलांना पालकत्व मिळाले पाहिजे तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. तेव्हा समाजाने पुढे येऊन अशा बालकांचे प्रतिपालकत्व स्वीकारावे असे प्रतिपादन लातूर येथील एमआयटीत स्वनाथ फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. श्रेया श्रीकांत भारतीय यांनी केले.
लातूर येथील एमआयटीच्या वैद्यकीय महाविद्यालयात आ. रमेशआप्पा कराड यांच्या संकल्पनेतून अनाथ बालकाचे पालकत्व योजनेबाबत जनजागृती व्हावी यासाठी स्वनाथ फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. श्रेया श्रीकांत भारतीय यांचा महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्याशी संवाद कार्यक्रम गुरुवारी झाला. यावेळी एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशआप्पा कराड महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. एन. पी. जमादार, स्वनाथच्या सौ. सारिका पन्हाळकर, सौ. संजीवनीताई कराड, शैक्षणिक प्रकल्प व प्रशासकीय अधिकारी सरिता मंत्री, शैक्षणिक संचालक चंद्रकांत शिरोळे, महाविद्यालयाचे उप अधिष्ठता डॉ. बी. एस. नागोबा, डॉ. चंद्रकला पाटील, डॉ. वर्षा कराड यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. विश्वनाथजी कराड साहेबांनी एमआयटी परिवाराच्या माध्यमातून विश्वशांतीचे मोठे आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य केले असून भारतीय प्राचीन संस्कृतीला गौरवशाली इतिहास असतानाही त्यास तिलांजली देऊन केवळ नवी शिक्षण पद्धती स्वीकारली नवे शिक्षण नोकरीसाठीच ही स्थिती निर्माण झाली याचे परिणाम आज भोगत आहोत असे सांगून श्रेया भारतीय म्हणाल्या की, माणसाच्या गरजा पूर्ण करणारी भारतीय संस्कृती असून ही संस्कृती अबाधित ठेवून सामाजिक, अध्यात्मिक, बौद्धिक शिक्षण देण्याची गरज आहे. केवळ धोरण राबविण्यापुरते शिक्षण असता कामा नये त्यात अध्यात्मिक पावर असली पाहिजे.
जगात दररोज दहा हजाराहून अधिक मुले अनाथ होतात यातील अनेक मुले बालगृहात, अनाथ आश्रमात दिसून येतात. अनाथ मुलाच्या बाबतीत जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे असे सांगून श्रेया भारतीय म्हणाल्या की, बालपण महत्त्वाचे असते त्याच काळात संस्कार होतात, बालकावर परिणाम आणि दुष्परिणाम घडून जातात त्यामुळे अनाथ मुलांना प्रतिपालकत्व मिळणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलाला पालकत्व मिळाले पाहिजे हा त्याचा मूलभूत अधिकार असून पालकत्वाशिवाय अनाथांची मायेची भूक भागणार नाही असे त्यांनी बोलून दाखविले.
पुढे बोलताना श्रेया भारतीय म्हणाल्या की, भारताला प्राचीन परंपरा आणि संस्कृती महान आहे वसुदेव आणि देवकी कैदी असताना आपल्या मुलाचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी श्रीकृष्णाला यशोनंदाकडे सुपूर्द केले आणि त्याचे व्यवस्थित पालन पोषण झाले अशाप्रमाणे प्रत्येक अनाथ श्रीकृष्णाला यशोदानंद मिळाला पाहिजे यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे योगदान दिले पाहिजे मायेची उब देण्याचे काम करावे असे आवाहन केले.
मुल नसलेले पालक अनाथ मुलांना कायमस्वरूपी दत्तक घेतात ही आनंदाची बाब आहे. ज्यांना मुले आहेत अशा क्षमता असणाऱ्यानीही प्रतिपालकत्व स्वीकारून अनाथांना आधार द्यावा यासाठी स्वनाथ फाउंडेशनच्या वतीने देशाच्या वेगवेगळ्या राज्यात शासनाच्या सहकार्याने काम केले जात असून याबाबत समाजात जनजागृती व्हावी आणि मुलाच्या हक्काचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे याकरिता प्रयत्न केले जात आहेत असे श्रेया श्रीकांत भारतीय यांनी बोलून दाखविले.
प्रारंभी डॉ. एन. पी. जमादार यांनी प्रास्ताविकात एमआयटीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय गावकरी यांनी केले तर शेवटी डॉ. बी. एस. नागोबा यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. अरुणकुमार राव, डॉ. एकनाथ माले, डॉ. गजानन गोंधळी, प्राचार्य सर्वानन, डॉ. विद्या कांदे, डॉ. शैला बांगड, डॉ. महेंद्र बिक्कड, डॉ. बसवराज वारद, डॉ. तापडिया, डॉ. मालू, डॉ. आडगावकर, डॉ. लक्ष्मण कस्तुरे, डॉ रवी इरपतगिरे, मुख्य प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, प्रशासकीय अधिकारी मधुकर गुट्टे, डॉ. संजीवनी मुंडे, भागवत शेळके, दयानंद कोळपे, डॉ. घुले, श्रीपती मुंडे, डॉ. पठाण डॉ. शशिकांत कौलसकर, डॉ. पिचारे मॅडम यांच्यासह एमआयटी वैद्यकीय महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय येथील सर्व विभाग प्रमुख, डॉक्टर्स, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.