उदगिर येथे राज्यस्तर युवा महोत्सवाचे आयोजन ; अत्याधुनिक सोयी सुविधांचे क्रीडा संकुल निर्माण करण्यासही मंजूरी-क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे
> युवकांचा सर्वांगीण विकास करणे संस्कृती व परंपरा जतन करणे युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे यासाठी प्रतिवर्षी जिल्हा, विभाग, राज्यस्तर युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे याच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येते.
> त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, लातूरमार्फत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तर युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक २९ ते ३१ डिसेंबर, २०२३ या कालावधीत प्रथमच उदगीर या ऐतिहासिक शहरामध्ये करण्यात येत आहे.
> सदर युवा महोत्सवामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिध्द असलेले लोकनृत्य, लोकगीत त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्राने सन २०२३ हे वर्ष "आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य" म्हणून घोषित केले असून, त्यांच्या अनुषंगाने तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान या संकल्पेनवर सहभागी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
> तसेच कौशल्य विकास विभागामध्ये कथाकथन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, फोटोग्राफी व युवाकृती विभागामध्ये हस्तकला, वस्त्रोद्योग, युवा प्रोडक्ट अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या राज्यस्तर युवा महोत्सवामधून मौजे नाशिक येथे दिनांक १२ ते १६ जानेवारी, २०२४ या कालावधीत होणा-या “राष्ट्रीय युवा महोत्सव, २०२३-२४" करिता महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे.
राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील आठ विभागातील प्रत्येक विभागातून १०० याप्रमाणे ८०० युवा वर्धक व परीक्षक, संयोजक इत्यादी सुमारे १०० व्यक्ती असे एकूण ९५० लोक यामध्ये भाग घेणार आहेत. युवा व सहभागी होणाऱ्या संयोजक व परीक्षकांची निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
> महाराष्ट्रात राबविलेला शिक्षणाबाबतचा "लातूर पॅटर्न'ची सुरवात ही या जिल्ह्यापासून झालेली आहे. तसेच महाराष्ट्रातील पाच पशु वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक महाविद्यालय उदगीर या शहरामध्ये आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या भारत देशाच्या राष्ट्रध्वजाचे, तिरंगा झेंड्याचे कापड येथे तयार केले जाते.
> महाराष्ट्र राज्याचे क्रीडा क्षेत्र प्रगतीच्या मार्गावर असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील खेळाडूंनी अधिकाधिक चांगली कामगिरी करावी; तसेच त्यांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून मा. मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली "मिशन लक्ष्यवेध" सुरु करण्यात आलेले आहे. याचा लाभ ग्रामीण तसेच शहरी भागातील खेळाडूंना होईल यात शंका नाही. या योजनेंतर्गत १२ खेळ निश्चित करण्यात आलेले असून, याकरिता रुपये १६० कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याअंतर्गत ३७४० खेळाडूंच्या अद्ययावत प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे मा. मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार १. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर कबड्डी, २. स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तर कुस्ती ३. कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तर खो-खो ४. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या रक्कम रुपये ५०.०० लक्ष अनुदानामध्ये वाढ करुन रुपये ७५.०० लक्ष करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमधील स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तर कुस्ती स्पर्धा लातूर मध्ये घेण्यात येत आहे.
तसेच राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षीस रक्कमेमध्ये वाढ करुन, वैयक्तिक खेळामध्ये सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस रुपये १००. लक्ष, क्रीडा मार्गदर्शकास रुपये १०.०० लक्ष, रौप्य पदक प्राप्त खेळाडूस रुपये ७५.०० लक्ष, क्रीडा मार्गदर्शकास रुपये ०७.५० लक्ष व कास्य पदक प्राप्त खेळाडूस रुपये ५०.०० लक्ष, क्रीडा मार्गदर्शकास रुपये ०५.०० लक्ष देण्यात येत आहेत. तसेच सांधिक खेळामध्ये सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस रुपये ७५.०० लक्ष, क्रीडा मार्गदर्शकास रुपये ०७.५० लक्ष, रौप्य पदक प्राप्त खेळाडूस रुपये ५०.०० लक्ष, क्रीडा मार्गदर्शकास रुपये ०५.०० लक्ष व कास्य पदक प्राप्त खेळाडूस रुपये २५.०० लक्ष, क्रीडा मार्गदर्शकास रुपये ०२.५० लक्ष देण्यात येत आहेत.
> मा. मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ पासून पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक प्राप्त कै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन म्हणुन साजरा केला जाणार आहे.
> महाराष्ट्र राज्याने दिनांक २५ ऑक्टोंबर ते ०९ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत गोवा येथे झालेल्या नॅशनल गेम्समध्ये ८० सुवर्ण पदक, ६९ रौप्य पदक, ७९ कास्य पदक असे एकूण २२८ पदकांची कमाई करुन, देशामध्ये प्रथम क्रमांक संपादन केलेला आहे.
> तालुका क्रीडा संकुल, उदगीर येथे रुपये ९ कोटी ८९ लक्षचे अत्याधुनिक क्रीडा संकुलाचे काम त्याचबरोबर उदगीर मधील तळवेज या क्रीडा संकुलामध्ये रुपये ६२ कोटी अशा एकूण ७२ कोटीच्या अत्याधुनिक सोयी सुविधांचे क्रीडा संकुल निर्माण करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे,
> तसेच युवा महोत्सव कार्यक्रमामध्ये अर्जुन पुरस्कारार्थी व युथ आयकॉन या सारख्या राज्य-राष्ट्रीय पुरस्कार्थीना सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन दिनांक ३० डिसेंबर, २०२३ रोजीसायंकाळी ०६.०० वाजता तालुका क्रीडा संकुल, उदगीरच्या मैदानावर करण्यात येणार आहे. आज दिनांक २३.१२.२०२३ रोजी राज्यस्तर युवा महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात येत आहे.
> तसेच सन २०२३ करिता खेळामधील राष्ट्रीय स्तरावरील अर्जुन पुरस्कार कु. आदिती स्वामी आर्चरी, ओजस देवताळे आर्चरी, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी बॅडमिंटन, द्रोणाचार्य पुरस्कार श्री. गणेश देवरुखकर, मल्लखांब यांना प्राप्त झालेले आहेत.
> महाराष्ट्राच्या विविध विभागातून, जिल्ह्यातून आलेल्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी, कला पाहण्यासाठी त्यांचे कौतुक करण्यासाठी उदगीर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.