Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा पूजेला बसण्याचा भटके विमुक्त समाजाला सन्मान

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा पूजेला बसण्याचा भटके विमुक्त समाजाला सन्मान 
  महादेवराव गायकवाड, सौ निर्मला महादेवराव गायकवाड यांना निमंत्रण




        लातूर दि १० अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील अनेक गणमान्य व्यक्तींना निमंत्रण गेले आहे. या सूचीमध्ये भटके विमुक्त समाजाला सन्मान मिळाला आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला देशातील 11 कुटुंब सहपरिवार पूजेला बसणार आहे. या मुख्य पूजेला बसण्याचा मान भटके विमुक्त समाजाला मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामधील काक्रंबा या गावातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री महादेवराव गायकवाड यांना या पूजेला बसण्याचा सन्मान मिळाला आहे. श्री महादेवराव गायकवाड व त्यांच्या पत्नी सौ निर्मला महादेवराव गायकवाड यांना आयोध्या ट्रस्टचे निमंत्रण मिळाले आहे. अशी माहिती डॉ संजय पुरी कार्याध्यक्ष भटके विमुक्त विकास परिषद यांनी दिली आहे. 
  राम मंदिर ट्रस्ट कडून मरीआई (कडकलक्ष्मी) समाजाचा सन्मान करीत या समाजाचे सक्रिय कार्यकर्ते श्री दगडू निंबाळकर, पेनुर जिल्हा सोलापूर यांना या सोहळ्याचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. मरीआई समाज हा पाठीवर चाबूक मारून व देवीचा गाडा डोक्यावर फिरवून धर्माचे जागरण व प्रबोधन चे काम करतो या समाजाला हा सन्मान मिळाल्यामुळे संपूर्ण मरी आई समाज राम मंदिर ट्रस्टचे आभार व्यक्त करतो आहे. दगडू निंबाळकर हे भटके विमुक्त विकास परिषद चे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष आहे. या शानदार सोहळ्याचे निमंत्रण पद्मश्री प्राप्त दादा इदाते यांना सुद्धा मिळाले आहे. दादांनी केलेल्या कामाचा हा गौरव आहे. त्यासोबतच लेखिका व अभ्यासक डॉक्टर सुवर्णाताई रावळ, भिवंडी व मुंबई येथील अनिल फड यांना सुद्धा या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे.
        
महादेव गायकवाड हे कैकाडी समाजातील सक्रिय कार्यकर्ते असून त्यांचे शिक्षण एम ए एम एड झाले असून ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे.त्यांनी भटके विमुक्त जमाती संघटनाचे प्रांत सचिव असे सुद्धा पद सांभाळले आहे. समरसता मंचाचे सक्रिय कार्यकर्ते तसेच भटके विमुक्त विकास परिषद चे ते प्रांत निमंत्रक होते. भटके विमुक्त समाजासाठी यमगरवाडी सेवा प्रकल्प उभा करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. 
भटके विमुक्त समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचार घटनेमध्ये समाजाला न्याय मिळावा म्हणून त्यांनी शासन व पोलीस यांच्यासोबत अनेक वेळा संघर्ष केला आहे. 
अशा सक्रिय व संघर्षशील कार्यकर्त्याला तसेच भटके विमुक्त समाजातील कैकाडी समाजाला सन्मान मिळाल्याबद्दल संपूर्ण भटके विमुक्त समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Previous Post Next Post