लातूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय संत संदेश पक्षाचा पहिला उमेदवार अॅड. श्रीधर कसबेकर जाहीर
- राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र बनारसे यांनी
अॅड. श्रीधर कसबेकरांच्या उमेदवारीची केली घोषणा
लातूर - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 50 नोंदणीकृत राजकीय पक्षांनी एकत्र येवून भारतीय जनविकास आघाडी निर्माण केली असून या तिसर्या आघाडीअंतर्गत राष्ट्रीय संत संदेश पक्षाने आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा आज 20 जानेवारी रोजी केली असून पुणे येथील अॅड. श्रीधर एल. कसबेकर हे अधिकृत उमेदवार लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र बनारसे यांनी आज लातूर येथे अंबिका हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. यावेळी उमेदवार अॅड. श्रीधर कसबेकर, पक्षाचे महासचिव अॅड. शिवकुमार स्वामी औंधकर, लातूर जिल्हाध्यक्ष पांडुरंग शिंदे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष हभप रामेश्वर महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड. श्रीधर कसबेकर हे उमेदवार प्रख्यात वकिल आणि क्रांतीवीर लहूजी साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून ते भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. ते मूळचे बार्शी तालुक्यातील कोरफळचे रहिवाशी असून त्यांचा लातूरशी घनिष्ठ संबंध आहे. तसेच सर्व धर्म, पंथातील समाज समूह तसेच दुर्बल, उपेक्षित, वंचित, सर्वहारा मराठी भाषिक आरक्षण समर्थकांचा समरसतावादी कार्यकर्ता प्रतिनिधी म्हणून लातूर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तसेच राष्ट्रीय संत संदेश पक्ष राज्यातील लातूरसह सांगली आणि नाशिक या तीन लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. या पक्षाचे निवडणुक चिन्ह नगारा असून स्तुती छोडो धनवान की कदर करो इन्सान की, असे ब्रीद असल्याचे राजेंद्र बनारसे यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक क्रांतीची या देशाला अजूनही गरज आहे. त्यासाठीची आमची धडपड आहे. त्यामुळे विकासाचा अजेंडा घेवून भारतीय जनविकास आघाडी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. राष्ट्रीय संत संदेश पक्ष सध्या प्रचारात आघाडीवर आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातील सुमारे 900 गावात पक्षाचे सदस्य, कार्यकर्ते काम करत असल्याची माहिती खुद्द या पक्षाचे उमेदवार अॅड. श्रीधर कसबेकर यांनी दिली आहे.