Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मराठा समाजाला न्याय दिल्याबद्दल राज्‍यातील महायुती शासनाचे आ. कराड यांनी केले अभिनंदन

मराठा समाजाला न्याय दिल्याबद्दल राज्‍यातील महायुती शासनाचे आ. कराड यांनी केले अभिनंदन



        लातूर दि.२७-मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही अनेक वर्षाची मागणी राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती शासनाने मान्य केली असून मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतल्याबद्दल राज्यातील महायुती शासनाचे आभार व्यक्त करून या निर्णयाचा मराठा समाजातील गोरगरीब बांधवांना लाभ होईल असे भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखवले.

          मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर सोयी सवलती मिळाव्यात याकरिता गेली अनेक वर्ष आंदोलन सुरू होते. मराठा समाजाच्या या न्याय हक्काच्या मागणीचा विचार करून मागील काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते आणि न्यायालयात टिकवले होते असे सांगून भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, मात्र नंतरच्या काळात सत्ता बदलानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने उच्च न्यायालयात योग्य ती बाजू मांडली नसल्याने मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकवता आले नाही.

         राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सत्ता आली आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे मागणीसाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झाले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुरुवातीपासूनच भूमिका असल्याने महायुती शासनाने शासन स्तरावर योग्य ते पाऊले उचलून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली.

          मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे आंदोलनासाठी जात असताना वाशी येथे सरकार आणि आंदोलक यांच्यात चर्चा होऊन योग्य ती तडजोड करण्यात आली आणि २७ जानेवारी रोजी सकाळी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेशाची प्रत मनोज जरांगे यांना सुपूर्त केली. यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका स्पष्ट करून मी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण करण्याचे काम करीत आहे असे बोलून दाखविले. यावेळी मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे आणि महायुती शासनाचे जाहीर आभार मानले.

          राज्यातील महायुतीचे शासनाने मराठा समाजाला न्याय दिला हक्क दिला या निर्णयामुळे मराठा समाजातील गोरगरीब, गरजूंना निश्चितपणे लाभ होईल. घेतलेल्या या धाडसी आणि ऐतिहासिक निर्णयाबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्यातील महायुती शासनाचे मनःपूर्वक जाहीर आभार मानले.
Previous Post Next Post