लातूर येथे जिल्ह्यातील महायुतीच्या
कार्यकर्त्यांचा रविवारी महामेळावा
लातूर दि.१२- केंद्रातील आणि राज्यातील सतेत्त सहभागी असलेल्या महायुतीचे सर्व घटक पक्ष एका विचाराने काम करत आहेत. येत्या काळात होणाऱ्या निवडणूका लक्षात घेऊन बूथ स्तरावर महायुती अधिक मजबूत व्हावी यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा १४ जानेवारी २०२४ रविवार रोजी लातूर येथे महामेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
महायुतीच्या वतीने लातूर येथे भाजपाच्या संवाद कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीतील भाजपाचे समन्वयक आ. रमेशआप्पा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक आ. बाबासाहेब पाटील, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अँड. बळवंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अँड. व्यंकट बेद्रे, जिल्हाध्यक्ष अफसरबाबा शेख, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, आरपीआय आठवले गटाचे नेते चंद्रकांत चिकटे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, लातूर लोकसभा निवडणूक प्रमुख राहुल केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी जिप अध्यक्ष पंडितराव धुमाळ, प्रशांत पाटील, बबन देशमुख, देविदास कांबळे, अशोक कांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती प्रारंभी गुरुनाथ मागे यांनी प्रास्ताविक केले.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशात ४०० पार आणि राज्यात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा महायुतीच्या वतीने निर्धार करण्यात आला असल्याची माहिती देऊन आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा १४ जानेवारी रविवार रोजी सकाळी ११ वाजता लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालयात महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
भाजपा शिवसेनेची युती ही तडजोड नव्हे तर तत्त्वावर आधारित केलेली युती आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे खानदानी सरकार आहे. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अँड. बळवंत जाधव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात देश हितासाठी लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करणार आहोत.
भारतीय जनता पार्टी आणि पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याची महायुतीच्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की, भाजप सेना युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाले. राज्यस्तरावर ज्या पद्धतीने एकत्रित काम होत आहे त्याच पद्धतीने जिल्ह्यातही कार्यकर्त्याचे मनोमिलन व्हावे याकरिता महायुतीचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण देश सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अनेक विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. विविध योजनेचा गरजूंना लाभ मिळाला असून देश मजबूत होण्यासाठी येणाऱ्या काळात मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे आम्ही सर्व जण जिद्दीने, जोमाने कामाला लागलो आहोत असे खा. सुधाकर शृंगारे यांनी बोलून दिले.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना महायुतीच्या नेत्यांनी समर्पक उत्तरे दिली.