श्रीराम मंदिर मुर्ती स्थापनेच्या पूर्वसंध्येला जुना औसा रोड परिसरात भव्य शोभायात्रा; शेकडो महिला व नागरिकांचा सहभाग
लातूर/प्रतिनिधी: अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि.२१ )सायंकाळी शहरातील जुना औसा रोड परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत शेकडो महिलांसह नागरिकांनी सहभाग नोंदवला.
अयोध्येत सोमवारी प्रभू रामांच्या मूर्तीची स्थापना होत आहे.यानिमित्त देशभर विविध कार्यक्रम होत आहेत.लातूर येथेही शहराच्या प्रत्येक भागात कार्यक्रमांची रेलचेल दिसून येत आहे.जुना औसा रोड परिसरात या भागाचे माजी नगरसेवक तथा माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या पुढाकारातून या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रकांत बिराजदार यांनी श्रीराम मूर्ती स्थापनेच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवत या भागातील ११ मंदिरांवर विद्युत रोषणाई केली आहे.या सर्व मंदिरांच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली असून तेथे सोमवारी सायंकाळी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
राघवेंद्र कॉलनीतील सिद्धिविनायक मंदिर,मीरा नगर येथील ओंकार हनुमान मंदिर,अयोध्या कॉलनीतील श्रीराम मंदिर, कृषी कॉलनीतील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर,विराट हनुमान मंदिर,ज्ञानेश्वर नगरातील पंचमुखी हनुमान मंदिर,विद्यानगर येथील विद्या हनुमान मंदिर,एलआयसी कॉलनीतील रुद्रेश्वर मंदिर, रुद्रेश्वर नगर मधील रुद्र हनुमान मंदिर,सहयोग कॉलनीतील शनी मंदिर आणि कन्हेरी गाव परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर बिराजदार यांनी रोषणाई केली आहे.त्या- त्या मंदिराचे विश्वस्त किशोर सास्तुरकर,ठाकूर,भगवान माकणे,भोसले,सौ. शोभाताई पाटील, कवठाळकर,विकास बचुटे,कोरके,जोशी व अमर देशमुख यांच्या समन्वयातून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेस लगसकर बिल्डिंग पासून सुरुवात झाली.अयोध्या कॉलनीतील श्रीराम मंदिर येथे या यात्रेचा समारोप झाला.डोक्यावर कलश घेतलेल्या शेकडो महिला या यात्रेत अग्रभागी होत्या. सजवलेल्या रथात श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमंताचा वेष परिधान केलेल्या बालकांनी लक्ष वेधून घेतले.बँड व ढोल ताशा पथक,विविध वाद्यांच्या गजरात प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा निघाली.
रविवारी रुद्रेश्वर मंदिर येथे श्री राम मूर्ती स्थापनेचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची सोय करण्यात आली आहे.यावेळी भव्य आतिषबाजी केली जाणार आहे.सायंकाळी सर्व मंदिरांत दीपोत्सव होणार असून यावेळीही नयनरम्य आतिषबाजी करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी सकाळी रुद्रेश्वर मंदिर,शनी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विद्या हनुमान मंदिर मार्गे परत रुद्रेश्वर मंदिर अशा शोभायात्रेच्या आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर रुद्रेश्वर हनुमान मंदिर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून श्रीराम मूर्ती स्थापनेच्या उत्सवात सहभागी व्हावे,असे आवाहन माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,अमोल जाधव, विजयकुमार स्वामी, व्यंकटेश कुलकर्णी यांनी केले आहे.