नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
----------------------------------------------
नवे शैक्षणिक धोरण समाजात विषमता
निर्माण करणारे : प्रा. ऋषिकेश कांबळे
एड. मनोहरराव गोमारे साहित्यनगरी, लातूर : कौशल्य विकासाच्या नावाखाली विज्ञानाला नाकारणारे नवे शैक्षणिक धोरण समाजात विषमता निर्माण करणारे असल्याने त्याला थोपविण्याची जबाबदारी समस्त समाजाची असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. ऋषिकेश कांबळे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने लातुरात आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष या नात्याने प्रा. ऋषिकेश कांबळे आपले विचार व्यक्त करत होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे मुख्य संयोजक कालिदास माने, ज्येष्ठ साहित्यिक फ. म . शहाजिंदे, ज्येष्ठ कवी योगीराज माने, महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंतप्पा उबाळे, प्रा. गोविंदराव घार , प्रभाकर कापसे, अभंगराव बिराजदार, प्रा. यु.डी. गायकवाड, ब्रिजलाल कदम, संजय आलमले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमा पूजनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
संमेलनाध्यक्ष या नात्याने उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. ऋषिकेश कांबळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आणलेल्या खाजगी विनाअनुदानित तत्वाच्या निर्णयाने समाजात विषमता वाढीस लागल्याचा आरोप केला. विनाअनुदानित तत्वामुळे संस्थाचालक तर अडचणीत आलेच, त्याचबरोबर गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षणही धोक्यात आल्याचे सांगितले. आता नव्याने अंमलात आणला जाणारा सन २०२० चा शिक्षण मसूदाही कौशल्य विकासाच्या नावाखाली समाजात विषमता वाढवणारा आहे. नवे शैक्षणिक धोरण अन्यायकारक असून त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत जाऊही शकणार नाही. जुन्या काळात उत्तम संस्काराची बूज राखण्याचे काम शिक्षक करत असत. शिक्षक हे संस्कृती, समाज, राष्ट्र - आदर्शांचे शिल्पकार असतात. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत शिक्षकांची जबाबदारी वाढणार असल्याचे नमूद केले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवाच्या सुखासाठी असल्याची जाणीव भारतीयांना सर्वप्रथम करून देण्याचे काम ब्रिटिशांच्या राजवटीत लॉर्ड डलहौसीने केले होते, ही बाब सर्वज्ञात आहे. डलहौसीमुळे आपल्या देशात रेल्वे, पोस्ट, तारखाते, विधानपरिषद अस्तित्वात आल्याचे सांगून पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले नसत्या तर आज समाजातील कोणतीही स्त्री सुशिक्षित होऊ शकली नसती असे कांबळे यांनी सांगितले. फुले दाम्पत्यांची ही प्रेरणा समाजाला किती पुढे घेऊन जाऊ शकली ते आजच्या सुशिक्षित महिलांकडे पाहिल्यास लक्षात येते. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांचे शिक्षणविषयक विचार अत्यंत प्रेरणादायी होते, ही बाब कदापि नाकारून चालणार नसल्याचे प्रा. ऋषिकेश कांबळे यांनी सांगितले.
यावेळी उद्घाटक म्हणून आपले विचार व्यक्त करताना शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी शिक्षक साहित्य संमेलनाने शिक्षकांचे अनेक पैलू समाजासमोर येण्यास मोलाची मदत होणार असल्याचे सांगितले. यावेळी योगीराज माने, गोविंद घार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे विस्तृत प्रास्ताविक संयोजक कालिदास माने यांनी केले. प्रास्तविकात त्यांनी या साहित्य संमेलनाच्या आयोजनामागची पार्श्वभूमी सविस्तरपणे विशद केली. आपल्या पहिल्या साहित्य संमेलनाला तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख आवर्जून उपस्थित होते हे सांगताना माने यांचा कंठ अक्षरशः दाटून आला. या साहित्य संमेलनात विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून समारोप सत्रात लोकनेते विलासराव देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार वितरण व कालिदासराव माने गौरव ग्रंथाचे प्रकाशन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले. यामध्ये ज्ञानरत्न पुरस्कार डॉ. जनार्दन वाघमारे यांना, प्रा. शिवराज मोटेगावकर यांना जीवनगौरव तर ज्ञानेश्वर ठाकरे यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे सांगितले. उद्योगरत्न पुरस्कार द्वारकादास श्यामकुमारचे तुकाराम पाटील यांना तर प्रशासकरत्न पुरस्काराने लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचेही माने यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विवेक सौताडेकर यांनी तर आभार प्रदर्शन अभंग बिराजदार यांनी केले. या साहित्य संमेलनास राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.