Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

राम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त लातूर येथील सिध्देश्वर मंदिर येथे भव्य स्क्रीनवर थेट प्रक्षेपण.

राम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त लातूर येथील सिध्देश्वर मंदिर येथे भव्य स्क्रीनवर थेट प्रक्षेपण.

लातूरकरांनी ग्रामदैवताच्या साक्षीने मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अनुभवण्याचे आवाहन.

भव्य स्क्रीनवर थेट प्रक्षेपण, राम सीता वाटिका, स्वच्छता मोहीम, पुष सजावट, यज्ञ, महाआरती, रामरक्षा पाठ, दीपोत्सव, भजन संध्या अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन.


लातूर;
अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी रोजी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्ताने लातूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर व रत्नेश्र्वर देवस्थानच्या वतीने लक्षवेधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व लातूरकरांनी ग्रामदैवताच्या साक्षीने मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अनुभवण्याचे आवाहन देवस्थान प्रशासक, विश्वस्त मंडळ आणि भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिर अनोख्या विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे तसेच मुख्य गर्भगृह आणि सभामंडप येथे मनमोहक पुष्प सजावट केली जात आहे. देवस्थानच्या वतीने दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महानगरपालिका प्रशासनाच्या सौजन्याने मंदिर आणि तीर्थकुंड परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच राम सीता वाटिका हा अभिनव उपक्रम राबवित रामफळ आणि सीताफळ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजलेपासून भव्य स्क्रीनवर सोहळ्याचे थेट प्रेक्षेपण केले जाणार असून सकाळी ११:३० वाजता यज्ञ प्रारंभ केला जाईल, दुपारी १२:३० वाजता रामरक्षा पाठ हजारो भाविकांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. तसेच मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपल्यानंतर श्रीराम प्रतिमेची आरती करण्यात येवून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २२ जानेवारी रोजी संध्याकाळी श्री राम भजन संध्येस प्रारंभ होईल, आणि ७:४५ वाजता श्री सिध्देश्वराची महाआरती संपन्न होणार आहे. तसेच रात्री ९:३० वाजता ११ हजार दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यात सर्व लातूरकरांनी सहपरिवार सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्र्वर देवस्थान प्रशासक, विश्वस्त मंडळ, आणि भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट 
भव्य स्क्रीनवर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण.
सिध्देश्वर मंदीर सभामंडप येथे भव्य स्क्रीन उभारण्यात येणार असून एकच वेळी हजारो भाविक ग्रामदैवताच्या साक्षीने अयोध्या येथे होणार मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अनुभवू शकणार आहेत.

चौकट २ 
राम सीता वाटिका
श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात राम सीता वाटिका साकारण्यात येणार असून रामफळ आणि सीताफळ या वृक्षांचे वृक्षारोपण करून या सोहळ्याच्या स्मृतींचे जतन करण्यात येणार आहे.

Previous Post Next Post