शिवसेना आमदार अपात्रते संदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल
शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. आमदार अपात्रता, तसेच मूळ राजकीय पक्ष कोणाचा आहे. यासंदर्भात 34 याचिका आल्या होत्या. पाच गटांमध्ये विभागलेल्या या याचिकांवर महत्त्वपूर्ण निकाल देताना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य करीत शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्यास राहुल नार्वेकर यांनी नकार दिला. शिवाय मूळपक्षदेखील एकनाथ शिंदे यांचाच असल्याचे आपल्या निकालपत्रात नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या काळात 2018 मध्ये बदल केलेली घटना मान्य नाही. त्यातील बदल ग्राह्य नाहीत. निवडणूक आयोगाकडून 1999 मधील शिवसेनेची प्राप्त झालेली घटना शिवसेनेची खरी घटना आहे, असे सांगत 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही, असे निरीक्षण नार्वेकरांनी मांडले. खरी शिवसेना कोणाची, हे ठरवण्याचा अधिकार मला आहे. उद्धव ठाकरे हे उलटतपासणीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र मान्य करणार नाही, असे नार्वेकरांनी निकाल देताना सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप नार्वेकर यांनी वैध ठरवला.
या 16 आमदारांवर होती सुनावणी...
एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमूलकर, रमेश बोरनारे, बालाजी कल्याणकर या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
गुवाहाटी ते मुंबई प्रवास करीत झाले मुख्यमंत्री
20 जून 2022 राज्यात विधानपरिषदेची निवडणूक पार पडली आणि त्याचदिवशीच्या रात्री पहिला राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी बंड करीत आमदारांना आपल्यासोबत घेत मुंबईमार्गे सुरत, मग सुरतमार्गे गुवाहाटीला गेले. तेथून उद्धव ठाकरेंच्याविरोधात बंड केल्याचे स्पष्ट केले. पुढे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने आपल्यासोबतच्या आमदारांसोबत एकनाथ शिंदे गोवामार्गे परत मुंबईला आले. सत्तास्थापनेचा त्यांनी दावा करीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
अधिकृत पक्ष एकनाथ शिंदेंना मिळाला
निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023 रोजी पक्ष कोणाचा यावर निकाल दिला. एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि 'धनुष्यबाण' हे चिन्हही त्यांना दिलं. या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्यावर अद्यापही सुनावणी सुरूच आहे. न्यायालयाने आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभाध्यक्षांना निकाल देण्यास सांगितले होते.
१. शिंदे गट खरी शिवसेना आहे.
२. भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरते.
३. एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरते.
४. ठाकरे गटाच्या नोटीसप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचं सादर पुराव्यांवरून सिद्ध होत नाही.
५. सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली जात आहे.
६. शिंदे गटानं दाखल केलेली ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणीही फेटाळली जात आहे.