अहमदपूर येथे पंधरा हजार स्क्वेअर फूट मध्ये दिव्यांनी बनवणार भव्य प्रभू श्री रामचंद्राची कलाकृती
श्री क्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र प्राणप्रतिष्ठेनिमित्त लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्यातर्फे रामदरबाराच्या भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन!
लातूर.- माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार लातूर लोकसभा मतदारसंघात अहमदपूर निजवंते नगर, थोडगा रोड येथे 19 जानेवारीपासून प्रभू रामचंद्राच्या राम दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये पंधरा हजार स्क्वेअर फूट मध्ये भव्य-दिव्य अशी कलाकृती साकार होत असून त्यामध्ये दोन लाख तीस हजार पणत्यांचा वापर केला जाणार आहे. यावेळी पाच हजार हायड्रोजनचे फुगे आकाशात सोडले जाणार आहेत. शंभरहून अधिक कलाकार 14 जानेवारीपासून अहोरात्र कार्यरत आहेत. तसेच येत्या 22 तारखेला सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टीचे आयोजन देखील केलेले आहे. त्यासोबतच भव्य अशा एलईडी स्क्रीनवर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील होणार आहे. तसेच अहमदपूर नगरीमध्ये प्रथमच भव्य-दिव्य अशा अर्ध्या तासाच्या आतिषबाजीच्या नयनरम्य अशा कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलेले आहे. तेव्हा सर्व भाविक भक्त यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केलेले आहे.