Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

औसा तालूक्यातील पशुधन विकास अधिकारी आणि ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात

 औसा तालूक्यातील पशुधन विकास अधिकारी आणि  ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  जाळयात

लातूर, दि. 27 (जिमाका) : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पशुधन गोठ्याचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व त्याचे पैसे मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी औसा पशुधन विकास अधिकारी हिरालाल गणपतराव निंबाळकर आणि उंबडगाव (बु.) ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालक माधव संग्राम येवतीकर यांना लाचलुचपत विरोधी पथकाने ताब्यात घेतले. तसेच औसा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावे औसा तालुक्यातील मौजे सत्तधरवाडी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पशुधन गोठ्याचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व त्याचे पैसे मंजूर करण्यासाठी औसा येथील पशुधन विस्तार अधिकारी कार्यालय (विस्तार) येथे कार्यरत पशुधन विकास अधिकारी (वर्ग-1) हिरालाल गणपतराव निंबाळकर यांनी 1 हजार रुपये लाचेची मंगनी केली होती. त्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 27 फेब्रुवारी 2024 रोजी तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली. यामध्ये श्री. निंबाळकर यांनी लाचेची रक्कम संगणक परिचालक माधव येवतीकर यांच्याकडे देण्यास सांगितली.

औसा पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेमध्ये शासकीय पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताच श्री. येवतीकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले. तसेच श्री. निंबाळकर यांना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक संतोष बर्गे करीत आहेत.

नांदेड परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे व अपर पोलीस अधीक्षक रमेशकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर, पोलीस हवलदार फारूक दामटे, भागवत कठारे, शाम गिरी, भीमराव आलुरे, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर कच्छवे, संदीप जाधव, दीपक कलवले, गजानन जाधव, संतोष क्षीरसागर यांनी ही कारवाई पार पाडली.

शासीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी नांदेड परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (भ्रमणध्वनी क्र. 09623999944), लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे (भ्रमणध्वनी क्र. 07744812535) यांच्याशी अथवा 1064 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 02482-242674 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
*****


Previous Post Next Post