शेतक-यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू;पोलिस आणी शेतकरी आंदोलकांमध्ये बाचाबाची
पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावले होते. ते बॅरिकेड्स तोडल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. काही तरुणांनी प्रथम शंभू सीमेवरील बॅरिकेड्स तोडण्यास सुरुवात केली, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. हरियाणा पोलिसांनी बॅरिकेड्स हटवण्यास नकार दिला होता. त्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तुम्ही पुढे जाऊ नका, अशा सूचना पोलीस देत असताना आंदोलक मात्र आक्रमक पवित्रा घेऊन पुढे जात आहेत.
दिल्ली ते नोएडाला जोडणा-या अक्षरधाम रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी यापूर्वीच ट्रॅफिक अॅडव्हायझरी जारी केली होती. आंदोलक शेतकरी साधारण ६ महिन्यांचं अन्नधान्य घेऊन या आंदोलनात उतरल्याची माहिती मिळाली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा शेतक-यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर आरएएफ तैनात
सिंघू सीमेवरील उड्डाणपूलही पूर्णपणे सील करण्यात आला आहे. मशिनचा वापर करून सिमेंटचे बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर आरएएफ तैनात करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेत्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आंदोलनावर ठाम असलेल्या शेतक-यांची समजूत काढण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र तब्बल ५ तास चाललेली बैठक निष्फळ ठरली. यानंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलनाची घोषणा करत दिल्लीकडे कूच करणार असल्याचे सांगितले. गाझीपूर, सिंघू, संभू, टिकरीसह सर्व सीमांचे छावणीत रूपांतर करण्यात आले आहे.