Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिवाई प्रतिष्ठानकडून क्षितिजा जयद्रथ जाधवचा सत्कार

शिवाई प्रतिष्ठानकडून क्षितिजा जयद्रथ जाधवचा सत्कार




लातूर : व्यवसायाला सामाजिक कार्याची जोड देत आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून महिला व मुलींना आत्मनिर्भर बनविण्याचे ध्येय ठेवुन शिवाई प्रतिष्ठानची पुढील वाटचाल असेल असे शिवाई प्रतिष्ठान अध्यक्ष उषा भोसले यांनी सांगितले. लातूरमध्ये उच्चशिक्षित महिलांचा शिवाई प्रतिष्ठान हा ग्रुप आहे. समाजातील मेहनती व अत्यंत जिद्दीने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणार्‍या मुलींचा सत्कार करून ही प्रेरणा अनेक मुलींनी घ्यावी म्हणून हिंगोली येथे नुकतेच सहाय्यक नगररचनाकार वर्ग 2 म्हणून रूजू झालेल्या क्षितिजा जयद्रथ जाधवचा सत्कार शिवाई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात जिजाऊ पुजन व दिप प्रज्वलनाने झाली. गीता पाटील यांनी खुप गोड आवाजात स्वागतगीत गायले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शुभांगी राऊत यांनी केले. शिवाई आता वटवृक्षा सारखी वाढत आहे असे त्या म्हणाल्या. कोषाध्यक्ष डॉ.मिनाक्षी पौळ यांनी संस्थेचा जमा खर्च अहवाल सादर केला. तर क्षितिजा जाधव ही लातूरचा पॅटर्न हिंगोली येथे राबवून जिल्ह्याला नवी दिशा देईल असा आशावाद डॉ.माधुरी कदम यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर नूतन अध्यक्षा उषा भोसले, सचिव डॉ.जयश्री धुमाळ, माजी अध्यक्षा डॉ.सुरेखा निलंगेकर, सचीव डॉ.शुभांगी राऊत, कोषाध्यक्ष डॉ.माधुरी कदम, डॉ.मिनाक्षी पौळ उपस्थित होत्या. हा कार्यक्रम कन्हैया हॉटेल बार्शी रोड लातूर येथे सायंकाळी सात वाजता संपन्न झाला. शिवाई प्रतिष्ठान लातूर नूतन पद हस्तांतरण सोहळा, सत्कार सोहळा आणि हळंदी-कुंकू असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. शिवाई प्रतिष्ठान पद हस्तांतरण करताना माजी अध्यक्षा डॉ.सुरेखा निलंगेकर व सचिव डॉ.शुभांगी राऊत यांनी नूतन अध्यक्षा उषा भोसले व सचिव डॉ.जयश्री धुमाळ यांच्याकडे पदाची सूत्रे दिली.
नूतन कार्यकारिणीतील उपाध्यक्ष सौ.संगीता देशमुख, डॉ.नीताताई मस्के, सहसचिव डॉ.संगीता वीर, कोषाध्यक्ष डॉ.माधुरी कदम, सहकोषाध्यक्ष सौ.सई गोरे यांचा सत्कार करण्यात आला. क्षितिजा जाधव व तीची आई स्नेहल जाधव यांचा सत्कार शिवाई प्रतिष्ठानकडुन करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना क्षितिजा म्हणाली की, चार वर्षाच्या खडतर अभ्यासातून स्पर्धा परीक्षेत हे यश संपादन केले आहे. स्पर्धा परीक्षेतील यशासाठी प्रत्येक स्पर्धकांनी मूलभूत अभ्यास, संयम चिकाटी, जिद्द आणि निराश न होता सातत्याने अभ्यास केल्याशिवाय यश मिळत नाही. मला हे करण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी सतत मार्गदर्शन करून प्रेरणा दिली. म्हणून मी यश मिळवू शकले. क्षितिजा मसाप शाखा लातूरचे अध्यक्ष डॉ.जयद्रथ जाधव यांची कन्या आहे. यावेळी मावळत्या अध्यक्षा डॉ.सुरेखा निलंगेकर यांनी आपल्या कार्यकाळातील कार्याचा आढावा घेत, मैत्री भाव जपत सामाजिक उपक्रमाला हातभार लावला. याबद्दल समाधान व्यक्त केले. नूतन अध्यक्षा उषा भोसले यांनी नवीन कार्यकारीणी समोर काही ध्येय ठेवले. सामान्य समाजातील यशस्वी गुणी मुलींना प्रोत्साहन देवुन त्यांना योग्य मदत करून प्रेरणा देणे, मुली व महिलांना स्वावलंबी बनविणे, महिलांचे आरोग्य जपत व नातेसंबंध सांभाळून कुटुंबाला सावरणे, गरजू व शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे, पर्यावरण पूरक काम करणे आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प केला. ही कार्यकारिणी 2024 ते 2027 या तीन वर्षांकरिता कार्यरत असणार आहे. शिवाई प्रतिष्ठानच्या सर्व महिला सदस्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संगीता दाताळ यांनी बहारदारपणे केले. आभाराची जबाबदारीही त्यांनी पार पाडली.

Previous Post Next Post