आरोग्य उपकेंद्राच्या जागेवरील पाण्याच्या टाकीचे
बांधकाम थांबविण्याची महापूर ग्रामस्थांची मागणी
काम न थांबविल्यास ग्रामस्थांचा उपोषण करण्याचा इशारा
लातूर ः महापूर (ता. लातूर) येथे पाण्याच्या टाकीचे व जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा ग्रामपंचायतीकडे असतानाही आरोग्य उपकेंद्राच्या जागेत पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजन करून नुकतेच बांधकाम सुरू करण्यात आले आहे. वास्तविक ग्रामपंचायतीकडे स्वतःची जागा उपलब्ध असताना उपकेंद्राची जागा कशासाठी ? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला असून, ही जागा देण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. हे काम तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी सोमवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची टाकी बांधकाम व जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेतला होता. गावातील जुन्या विहिरीच्या बाजूची जागा तसेच अंगणवाडी शाळा क्रमांक ४ व अंगणवाडी शाळा क्र. २ च्या बाजूच्या जागेचा ८-अ उतारा पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी दिला आहे. या जागेसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून टाकी बांधकाम व जलशुद्धीकरण केंद्रासाठी संमती दर्शविली होती. तरीही उपलब्ध असलेल्या जागेवर बांधकाम न करता आरोग्य उपकेंद्रातील जागेचा जाणीवपूर्वक काम सुरू केले आहे. याला ग्रामस्थांचा विरोध आहे. काही ग्रामपंचायत सदस्य इतर सदस्यांना व ग्रामस्थांना विचारात न घेता आरोग्य उपकेंद्राच्या जागेवर पाण्याच्या टाकी व जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन केले आहे. ते चुकीचे व अन्यायकारक आहे. याच्या विरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन काम न थांबविल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.