अशोक चव्हाण यांनी दिला काँग्रेस पक्षाचा राजीनामा
मुंबई -
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला असून आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेन असं ते म्हणाले. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचे कारण सांगता येणार नाही असे सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं असले तरीही ते भाजपाच्या वाटेवर असल्याचे आता उघड बोलले जावू लागले आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली. अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. त्यानंतर आपण आतापर्यंत अनेक वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे, आता नवा पर्याय शोधावा असं वाटतं अशं ते म्हणाले.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी, प्राथमिक सदस्यत्त्व विधिमंडळ काँग्रेस पक्ष राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. माझी कोणाबद्दल वेगळी भावना नाही. जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. आता मी निर्णय घेईन, दिशा ठरवेन. एक दोन दिवसात राजकीय भूमिका ठरवेन. भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही. मी अद्याप भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन.