इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आयएमएथॉन स्पर्धेची जय्यत तयारी
-------------------------------------------------------------------
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आयएमएथॉन स्पर्धेत
१ हजार ४९५ स्पर्धक सहभागी होणार : डॉ. अनिल राठी
लातूर : इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर तर्फे आयोजित आयएमएथॉन लातूर २०२४ ही मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. ३ मार्च २०२४ रोजी होणार असून ह्या स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाल्याची माहिती संयोजकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या स्पर्धेत एकूण १ हजार ४९५ स्पर्धक सहभागी होणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी यांनी सांगितले.
आयएमएच्या ही आयोजित करण्यात येत असलेली ही चौथी आवृत्ती असून दरवर्षी आयएमएथॉनला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. या मॅरेथॉनसाठी १४९५ धावपटूंनी आपली नावे नोंदवली आहेत. या सर्वांना धावताना बघणे व प्रोत्साहित करणे हा लातूरकरांसाठी खूप अविश्वसनीय अनुभव राहणार आहे. आयएमए लातूरच्या वतीने ह्या मॅरेथॉनची थीम Empower Her, Elevate All, Run for Equality in every Step अर्थात तिला सक्षम करा, सर्वांना उन्नत करा, प्रत्येक टप्प्यावर समानतेसाठी धावा अशी ठेवण्यात आलेली आहे. आठ मार्च रोजी होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्री शक्तीचे सक्षमीकरण आणि समानता अशी थीम आयोजकांनी विचारपूर्वक निवडलेली आहे. त्याबद्दल आयोजकांचे सहभागी स्पर्धक, डॉक्टर्स, शासकीय अधिकारी व राजकीय नेतेमंडळी ह्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मॅरेथॉन स्पर्धेच्या धावपटूंमध्ये महिलांचे प्रमाण देखील लक्षणीय असणार आहे. यावेळी बोलताना डॉ. अनिल राठी यांनी सांगितले की, २१ किमी स्पर्धेत एकूण १७१ स्पर्धक सहभागी होत असून त्यात महिलांची संख्या २४ तर पुरुषांची संख्या १४७ आहे. १० किमी स्पर्धेत एकूण ५१३ स्पर्धक सहभाग नोंदवत असून त्यात महिला ७५ आणि पुरुष ४३८ आहेत. ५ किमीमध्ये २३२ महिला व ३५२ पुरुष सहभागी होणार आहेत. तर ३ किमी स्पर्धेत १२२ महिला आणि १०५ पुरुष सहभागी होणार आहेत.
लातूरमध्ये होणारी ही एकमेव हाफ मॅरेथॉन स्पर्धा आहे. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील स्पर्धकांसोबत इतर जिल्ह्यातील स्पर्धकही उत्साहाने सहभाग नोंदवितात. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व लातूर अर्बन को. ऑप. लिमिटेड बँकेने स्वीकारले आहे. लातूरकरांच्या उत्तम आरोग्यासाठी, शरीर सुदृढतेसाठी आयएमएच्या वतीने नियमित विविध आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात. इंडियन मेडिकल लातूर शाखेतर्फे या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा ३ किमी, ५ किमी, १० किमी व २१ किमी अंतरासाठी होणार आहे. २१ किमी. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १२ हजार रुपये, द्वितीय ८ हजार, तृतीय ६ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. १० किमी. अंतरासाठी प्रथम पारितोषिक ७ हजार, द्वितीय ५ हजार तर तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये आहे. डॉक्टर्स गटासाठी तसेच त्यांचे कुटुंबिय व सर्वसामान्य जनतेमध्ये धावणे हा व्यायाम प्रकार रुजावा व त्याचे आरोग्यविषयक फायदे सर्वांना कळावे यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा अनेकांना प्रोत्साहित करणारी ठरली आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांना सुंदर असे मेडल्स आणि सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहेत. स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार टाईमिंग चिप, टी शर्ट, स्पर्धेनंतर अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्पर्धेआधी मॅरेथॉन स्पर्धेची तयारी करून घेण्यासाठी अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स नोंदणी केलेल्या स्पर्धकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे. त्यासोबतच स्पर्धेची पूर्व तयारी म्हणून झुंबा नृत्य प्रकाराचा सराव आदर्श व संतुलित आहार कसा ठेवावा, धावण्यासाठी सकारात्मक मानसिकता कशी ठेवावी याबद्दल देखील वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे. ही स्पर्धा दि. ३ मार्च रोजी सकाळी ५.३० मान्यवरांच्या हस्ते बिडवे लॉन्स याठिकाणी हिरवी झेंडी दाखवून सुरु होणार असून स्पर्धेचा समारोप सकाळी ९ वाजता बक्षिस वितरण सोहळ्याने होणार आहे.
लातूर अर्बन को. ऑप. लिमिटेड बँक मुख्य प्रायोजक असणाऱ्या या स्पर्धेचे सहप्रायोजक क्वालिटेक एलेव्हेटर्स, भारती अँड गित्ते ग्रुप, किर्तीगोल्ड उद्योग, सनरीच ऍक्वा, कौशल्य अकॅडेमी, स्पर्धेचे फूड पार्टनर हॉटेल कार्निवल व स्थळ प्रायोजक बिडवे लॉन्स असून स्पर्धेची सुरुवात व समारोप स्थळ बिडवे लॉन्स, औसा रोड येथे असणार आहे. बिडवे लॉन्स औसा रोड ते पीव्हीआर चौक ते नवीन रेणापूर नाका या मार्गावर होत असलेल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर पोलीस व महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज असून पोलीस निरीक्षक गणेश कदम हे समन्वय साधत असून धावपटूंना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेत आहेत. आयएमएथॉन २०२४ लातूर स्पर्धेसाठी आयोजकांना जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांनी शुभेच्छा दिल्या असून त्यांची प्रमुख उपस्थिती देखील राहणार आहे. आयएमएथॉन २०२४ साठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार धीरज विलासराव देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेशआप्पा कराड, आ. विक्रम काळे यांनी देखील शुभेच्छा दिल्या असून स्पर्धेच्या उद्घाटनासाठी व बक्षीस वितरणासाठी ही मान्यवर मंडळी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
तीन मार्च २०२४ रविवार रोजी लातूरचा रस्त्यावर उत्साह, ऊर्जा व स्पर्धा अनुभवण्यासाठी I च्या स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी नक्कीच सहभागी व्हा, फक्त धावण्यापुरतेच नाही तर इंडियन मेडिकल असोसिएशन लातूरच्या डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी, आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी व स्त्री शक्तीला सक्षम करण्यासाठी आयएमएथॉन २०२४ लातूरमध्ये जरूर सहभागी व्हावे व आपल्या आयुष्यात निरोगी राहण्यासाठी व्यायामाची सुरुवात आनंददायी पध्दतीने करा असे आवाहन आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, सचिव डॉ. आशिष चेपुरे, वूमेन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. प्रिती बादाडे, सचिव डॉ. प्रियंका राठोड, उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. राजेश दरडे , डॉ. जितेन जयस्वाल , कोषाध्यक्ष डॉ. अर्जुन मंदाडे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. आरती झंवर, डॉ. चांद पटेल, डॉ. ब्रिजमोहन झंवर, क्रीडा समितीचे सदस्य डॉ. अजय जाधव, डॉ. शशिकांत कुकाले, डॉ .चेतन सारडा, डॉ. विक्रम सारडा, डॉ. शितल ठाकूर - टीके, डॉ. सतीश हंडरगुळे, डॉ. चंद्रशेखर अष्टेकर , डॉ. ज्योती सूळ, डॉ. केतकी चवंडा यांसह सर्व आयएमए पदाधिकाऱ्यांनी केले आहे.