गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लिंगायत स्मशानभूमीत खोदकाम करून प्रेतांची विटंबना करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
लातूर जिल्हा जंगम समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
लातूर : लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत जेसीबी मशीनने खोदकाम करून दफनविधी केलेल्या पूर्वजांच्या प्रेतांची विटंबना करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत,अशी मागणी लातूर जिल्हा जंगम समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, मौजे गोंदेगाव ता. लातूर येथे पूर्वपरंपरागत गेली शंभर वर्षांपासून वीरशैव लिंगायत स्मशानभूमी आहे. सदरील स्मशानभूमीत वीरशैव लिंगायत समाजातील अनेक कुटुंबियांच्या पूर्वजांचा दफनविधी करण्यात आलेला आहे. आजही ही वहिवाटीची वीरशैव लिंगायत स्मशानभूमी आहे. या वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत सार्वजनिक पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी जेसीबी मशीनने खोदकाम करून दफनविधी केलेल्या प्रेतांच्या अस्थी बाहेर निघून प्रेतांची विटंबना झाल्याची तक्रार गोंदेगाव येथील जंगम समाज बांधवाने पोलिसात दिलेली आहे. ज्यांनी दफनविधी केलेल्या प्रेताची विटंबना केली आहे, त्यांच्यावर व जेसीबी चालकावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.अन्यथालातूर जिल्हा सकल वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. गोंदेगावच्या वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत घडलेल्या या निंदनीय प्रकारचा लातूर जिल्हा सकल लिंगायत समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर लातूर जिल्हा जंगम समाजाचे नेते त्र्यंबक गुरुनाथ स्वामी, चंद्रशेखर मल्लिकार्जुन स्वामी ( हुंडेकरी ), संगमेश्वर शिवमूर्ती स्वामी, निळकंठ स्वामी हरंगुळकर, शरणाप्पा महादयाप्पा दावणगिरे, बसवराज स्वामी लिंबाळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.