Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

नमो महारोजगार मेळाव्यात आज उमेदवारांच्या मुलाखती आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे करिअर विषयक मार्गदर्शन

नमो महारोजगार मेळाव्यात आज उमेदवारांच्या मुलाखती आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे करिअर विषयक मार्गदर्शन
· 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून मुलाखतींना होणार सुरुवात

· सुमारे 16 हजार युवक-युवतींनी केली ऑनलाईन नोंदणी




लातूर, दि. 23 : राज्य शासनामार्फत लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी उद्घाटन झाले. या मेळाव्यात आज, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून रोजगार इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होणार आहेत. लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानात आयोजित या मेळाव्यासाठी सुमारे 16 हजार युवक-युवतींनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या मेळाव्यात 24 फेब्रुवारी रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.

नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झालेले विविध उद्योग, आस्थापना यांच्यामार्फत रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सकाळी 9 पासून सुरु होणार आहे. मुख्य सभामंडपात सकाळी 11 पासून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि लाभार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील तज्ज्ञ रोहित पांढारकर यांचे, तसेच स्टार्टअप मधील संधी व आव्हाने याविषयी राजीव रंजन आणि कुणाल क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच फिजिओथेरेपी व वैद्यकीय करिअरमधील संधी याबाबतही मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हे युवक-युवतींना मार्गदर्शन करणार आहेत.

*****

 



यशासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवा
- प्रा. दिनेश पवार

‘करिअर कट्टया’त युवकांना मार्गदर्शन

लातूर, दि. 23 (जिमाका) : प्रत्येकजण स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत असतो, शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्ये आत्मसात करत असतो. या प्रक्रियेत शिक्षण हा महत्वाचा टप्पा असून तो आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या टप्प्यावर यशस्वी होण्यासाठी युवावर्गाने कठोर परिश्रमाची तयारी ठेवायला हवी, असे आवाहन ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रा. दिनेश पवार यांनी केले. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

युवक-युवतींसाठी रोजगार- स्वयंरोजगार आणि नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतात, परंतु, या संधीचा लाभ घेण्यासाठी अभ्यास कसा करावा, याचे पुरेसे ज्ञान त्यांच्याकडे नसते. अशावेळी आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्याची सर्वंकष माहिती घेऊन पुढे जाणे, आपला कल ओळखून करिअची निवड करणे महत्वाचे ठरते. रोजगार स्वयंरोजगाराबरोबरच स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतात. त्यातून बेरोजगारी कमी होण्यास मदत होते. सरकारी नोकरीसाठी ही तयारी महत्वाची ठरते. त्यादृष्टीने स्पर्धा परिक्षांचे अभ्यासक्रम माहित करून घेऊन पुर्ण क्षमतेने त्या परीक्षांना सामोरे जाण्याची गरज असते, असे प्रा. पवार म्हणाले.

महाराष्ट्राला अनेक संतांची आणि महापुरुषांच्या विचाराचे अधिष्ठान आहे. युवावर्गाने आपली वाटचाल करतांना हे विचार दृष्टीपथात ठेवण्याची, आत्मसात करण्याची गरज आहे. प्रयत्नांच्या पराकाष्ठतेतूनच आयुष्यातील संकल्प पूर्णत्वाला नेता येतो आणि तो प्रत्येकाने नेला पाहिजे असे मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केले. मार्गदर्शन सत्राला विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा वर्गाने सजग राहून रोजगार-स्वयंरोजगार माहिती घ्यावी-उत्तम गायकवाड

पूर्वी मोबाईल नव्हता, इंटरनेट सुविधा पण नव्हती. आज या सुविधा सहज उपलब्ध आहेत. मेळावे असतील किंवा अन्य माध्यमे यातून रोजगाराच्या तसेच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. अशावेळी युवा वर्गाने सजग राहून रोजगार-स्वयंरोजगाराची तसेच नोकर भरतीची माहिती प्राप्त करून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय अंगीकृत कंपनी एज्युकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अर्थात एडशील कंपनीचे महाव्यवस्थापक उत्तम गायकवाड यांनी केले. लातूर येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात ‘करिअर गाईडन्स’ विषयवार मार्गदर्शन करताना श्री. गायकवाड बोलत होते.

अनेक विभागामध्ये रिक्त पदे भरली जातात, त्याच्या जाहिराती येतात, याची माहिती युवक- युवतींना नसते, विद्यार्थ्यांना नसते. अनेक पदांसाठी स्पर्धा परिक्षा घेतल्या जातात. याची माहिती असणे अगत्याचे असते, त्यामुळे अशा संधींची उपलब्धता करून देणाऱ्या संकेतस्थळांना भेटी, माहिती घेणे, विविध माध्यमातून यासंबंधी येणाऱ्या बातम्यांचा मागोवा घेणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी श्री.गायकवाड यांनी पीपीटी सादरीकरणातून परीक्षा घेणाऱ्या वेगवेगळ्या एजन्सींची माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध परीक्षा बोर्डाची देखील माहिती दिली तसेच रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधीविषयी देखील सांगितले.
Previous Post Next Post