आगामी विधानसभा निवडणुकीवर जिल्ह्यातील
बंजारा समाज बहिष्कार घालणार.. !
दालचिनी सभागृहात बंजारा समाजाची व्यापक बैठक संपन्न
लातूर : सकल बंजारा समाजातील नागरिक,माता-भगिनी आदीची दि.28 जुलै रोजी औसा बायपास रोडवरील दालचिनी हॉटेलच्या सभागृहात दुपारी बैठक आयोजित करण्यात आली होती.
सबंध भारतामध्ये बंजारा समाजाची रहन-सहन चाली,रीती,परंपरा,वेशभूषा एकाच प्रकारचे असतानाही वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेले आहेत.परंतु ते जरी वेगवेगळे असले तरीही त्यांची जात बंजारा (लमाण) म्हणून एकच आहे. त्यामुळे या समाजाला तशाच पद्दतीने आंध्र,तेलंगणाच्या धर्तीवर एस.टी प्रवर्गात समावेश का करू नये ? असा सवालही यावेळी डॉ.अनिल राठोड यांनी उपस्थित केला.
या बैठकीला प्रा.डॉ.अनिल राठोड, माजी सभापती बापूराव राठोड, डॉ.टी.सी.राठोड ,माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास चव्हाण,सुरेश चव्हाण,रवीभाऊ चव्हाण आदीनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या बैठकीमध्ये बंजारा समाजाला आंध्र,तेलंगणाच्या धर्तीवर समाजाला एस.टी. प्रवर्गामध्ये समावेश करावा,लातूर शहरातील वसंतराव नाईक यांचा पुतळा नियोजित जागेत तात्काळ बसविण्यात यावा, प्रत्येक ग्रामपंचायतला स्वतंत्र महसूल आणि ग्रामपंचायत दर्जा देण्यात यावा, कर्नाटकाच्या धर्तीवर तांडा विकास निगमची स्थापना करावी आदी विषयावर सकल बंजारा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये सखोल अशा स्वरूपात मान्यवरांचे मार्गदर्शन मिळाळे,आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी सकल बंजारा समाजाच्या प्रमुख मागण्या जर प्रशासनाने मान्य नाही केल्या तर आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी सकल बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे. यावेळी सकल बंजारा संघर्ष आरक्षण समितीसह जिल्ह्यातील बंजारा समाजातील नेते,वरिष्ठ मार्गदर्शक,विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर लक्षणीय उपस्थिती होती.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रा. डॉ. अनिल राठोड यांनी बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा या प्रमुख मागणींसह अन्य न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी बंजारा समाज तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असल्याचे सांगितले. यावेळी बापूराव राठोड यांनीही अनुसूचित जमातीतील समावेशासाठी बंजारा समाज तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे सांगितले. यावेळी प्रकाश राठोड, सुरेश राठोड, नागेश पवार, शरद राठोड यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.
-------------------------
Tags:
LATUR