अंबुलगा कारखान्याच्या तिसऱ्या गळित हंगामाचा शुभारंभ ११ कुमारिकांच्या हस्ते मोळी पुजन
ऊस पुरवठादारांना जिल्ह्यात उच्चांकी दर देणार
- चेअरमन बोत्रे पाटील यांची घोषणा
निलंगा/प्रतिनिधी:अंबुलगा येथील डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लीज ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडच्या तिसऱ्या गळित हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि.१०)
करण्यात आला.कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्ह्यात उच्चांकी दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी या यावेळी बोलताना केली.विशेष म्हणजे ११ कुमारिकांच्या हस्ते मोळीचे पुजन करत यावेळी हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर तर मंचावर आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व सौ.रेखा बोत्रे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून अनेक वर्ष बंद असणारा हा साखर कारखाना बाबुराव बोत्रे पाटील यांनी सुरू केला आहे.सलग दोन वर्ष कारखाना यशस्वीपणे चालविल्यानंतर आता तिसऱ्या गळित करीत हंगामाचा शुभारंभ होत आहे.कारखाना सुरू झाल्यामुळे निलंगा तालुका व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळत असून स्पर्धात्मक वातावरणामुळे इतर कारखान्यांनाही अधिकचा दर देणे बंधनकारक झाले आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळचेवेळी ऊस बिले अदा केली जात असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत.या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या उसासाठी भटकंती करावी लागू नये,इतर कारखानदारांचे पाय धरावे लागू नयेत यासाठी हा कारखाना सुरू करण्यात आला आहे.दोन वर्ष कारखान्याने वेळेत ऊसाची बिले अदा केली असून पूर्ण क्षमतेने कारखाना कार्यान्वित करण्यात आला आहे.यावर्षी उपपदार्थ निर्मिती केली जाणार असल्याचेही आ.निलंगेकर म्हणाले.
आ.निलंगेकर यांनी सांगितले की,शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कारखाना महत्त्वाची भूमिका बजावत असतो.त्यामुळे यावर्षी कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक दर देण्याची परंपरा कारखान्याकडून यावर्षीही कायम राखली जाणार असल्याचे आ.निलंगेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट...
जिल्ह्यात उच्चांकी दर देणार - चेअरमन बोत्रे पाटील कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी कारखाना जिल्ह्यात उच्चांकी दर देणार असल्याचे सांगितले.हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवला जात आहे.शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचे कामकाज चालविले जात आहे.गतवर्षी कारखान्याने चांगला दर दिला.यंदाही जिल्ह्यात कारखाना उच्चांकी दर देईल असे आश्वासन बोत्रे पाटील यांनी दिले.प्रारंभी ११ कुमारिकांच्या हस्ते मोळी पुजन करण्यात आले.यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.