निलंगेकरांचा पुन्हा एकदा सुसंस्कृत पणाला कौल..
निलंगा मतदारसंघ राहणार जिल्ह्याच्या केंद्रस्थानी
निलंगा/प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचा अनुषंगाने उडालेली प्रचाराची धुळवड,आरोप-प्रत्यारोपांची राळ,विकास कामांची उजळणी, नेत्यांचे दौरे यामुळे संपूर्ण मतदारसंघ गेले काही दिवस ढवळून निघाला.या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात निलंगा मतदारसंघ पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला.विशेष म्हणजे प्रचाराच्या सांगतेनंतर निलंगा मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा सुसंस्कृत आणि संयमी राजकारणाला कौल दिला असल्याचे स्पष्ट झाले असून दि.
२३ रोजी लागणाऱ्या निकालाची औपचारिकता बाकी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
निलंगा विधानसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वीपासून खरंतर प्रचार सुरू झाला होता. तिकिटाची खात्री असल्याने माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रचाराला सुरुवातही केली होती. विरोधकांच्या उमेदवाराची घोषणा उमेदवारी अर्ज एक दिवस शिल्लक असताना झाली. त्यामुळे विरोधकांना तयारीसाठी फारसा वेळ मिळाला नाही. उमेदवाराची प्रतिमा आणि सुसंस्कृतपणा हा निलंगा मतदारसंघात या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला.
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मागील काळात केलेली विकासकामे,नागरिकांशी जपलेले नाते याचा मोठा प्रभाव जाणवला.गावोगावच्या नागरिकांसोबत असणारे वैयक्तिक संबंध आणि विकास कामांच्या अनुषंगाने जोडला गेलेला मतदार या आ. निलंगेकर यांच्यासाठी जमेच्या बाजु ठरल्या.
प्रचारादरम्यान विकासाचे मुद्दे मांडून अपप्रचाराला टाळणे ही बाबही महत्त्वाचे ठरली.आ.
निलंगेकर यांनी मागील १० वर्षात केलेल्या कामांचा लेखालोखा सादर केला.त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला. विरोधकांकडे विकासाचे कसलेही मुद्दे नसताना त्यांनी मात्र अपप्रचारावर भर दिला. त्याला उत्तर म्हणून विकासकामे दाखवण्यात आली.असे मुद्दे या निवडणुकीत प्रभावी ठरले.
घरंदाज राजकारणी आणि पोरकट उमेदवार यांच्यात जनतेनेच तुलना केली.आ.
निलंगेकर यांनी कुठेही,कधीही पातळी सोडली नाही.खालच्या पातळीवर टीका केली नाही. याच्यातून त्यांचा सुसंस्कृतपणा दिसून आला.
मतदारसंघात देशपातळीवरील नेत्यांच्या सभा झाल्या.राज्यातील व केंद्रातील मंत्री मतदारसंघात आले. प्रत्येकाने आ.निलंगेकर यांच्या कामाचे कौतुकच केले. राज्यपातळीवर नेतृत्व करण्यास आ.संभाजीराव पाटील सक्षम असल्याचे आणि निलंग्याचा लाल दिवा पक्का असल्याचा विश्वास त्यांनी दिला.आपल्या लोकप्रतिनिधीला मिळणारी ही शाबासकी निलंगेकर नागरिकांना सुखावून गेली.विशेषतः नितीन गडकरी यांनी केलेले भाषण निलंगेकरांची छाती अभिमानाने फुगवणारे ठरले.त्यामुळे प्रचाराची सांगता होत असताना निलंगेकर नागरिकांचा कौल कोणाकडे असेल ? हे स्पष्ट झाले.पुन्हा एकदा मंत्री होण्यासाठी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनाच विजयी करण्याचा निर्धार जनतेने केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.