मतदानरुपी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे आवाहन
निलंगा दि. १९ (प्रतिनिधी) : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदान होय. लोकशाहीने कोणताही भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळेच मतदानरूपी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन करून माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदान करताना राष्ट्रहित व उज्ज्वल भविष्य याचा विचार करून आपल्या सदसद् विवेक बुध्दीने मतदान करावे, अशी साद मतदारांना घातली आहे.
राज्यात विधानसभेची निवडणूक होऊ घातली असून या निवडणूकीसाठी आज दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून मतदानाकडे पाहिले जाते. लोकशाही व संविधानाने गरीब-श्रीमंत, जात-पात असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला मतदानाचा समान अधिकार दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या या अधिकाराचा योग्य वापर करणे अतिशय गरजेचे असल्याचे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुक ही मतदारसंघासह राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय महत्वाची आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशाला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे. त्यामुळेच प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहनही आ. निलंगेकर यांनी केले.
आ. संभाजी पाटीलनिलंगेकर हे आपल्या कुटूंबियांसह दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता औराद शहाजानी येथे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तरी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.