आ. संभाजी पाटील निलंगेकर यांना विविध संघटनांचा पाठींबा
निलंगा दि. १६ (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा निलंगा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघासह जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहती केली आहे. आगामी काळातही विकासाचा पॅटर्न घडावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडावा यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून आ. निलंगेकर यांना या विधानसभा निवडणुकीत विविध संघटनांच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात येत आहे. या संघटनांच्या पाठींब्यामुळे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याची वाटचाल सुकर होत आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार लोकहिताच्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर विकासाच्या योजनाही मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात साकारल्या जात असून अनेकविकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्या अनुषंगानेच निलंगा मतदारसंघातील केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे झालेली आहेत. त्याच बरोबर ही विकासगंगा सातत्याने वाहतच आहे. विशेष म्हणजे लोकहिताच्या अनेक योजनांचा लाभ मतदारसंघातील प्रत्येक समाजघटकांना होत आहे. आगामी काळातही ही विकासाची गंगा वाहती राहून लोकहिताच्या आणखी योजना आमलात आणण्यासाठी राज्यात भाजपा महायुतीचे सरकार पुन्हा येणे आवश्यक आहे. या महायुती सरकारमध्ये निलंग्याचे लोकप्रतिनिधी म्हणून संभाजी पाटील निलंगेकर यांची वर्णी लागणे तितकेच गरजेचे असल्याने त्यांच्या विजयासाठी विविध संघटना त्यांना जाहीर पाठींबा देत आहेत.
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विजयासाठी जाहीर पाठींबा देणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय बहुजन पार्टी,सगर (गवंडी समाज), ओबीसी हक्क परिषद, माळी महासंघ, स्वराज्य सेना, भारतीय फायटर सेना, खाकी फाऊंडेशन यांसह विविध संघटनांचा समावेश आहे. या संघटनांच्या राष्ट्रीय व प्रदेशाध्यक्षांनी आपल्या जाहीर पाठिंब्याचे पत्र आ. निलंगेकर व अरविंद पाटील निलंगेकर यांच्याकडे सुपूर्द केलेले आहे. त्याचबरोबर या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. निलंगेकर यांच्या विजयासाठी पूर्णपणे आपली ताकद त्यांच्या पाठिशी उभी करण्याचा संकल्प केलेले आहे.!