Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पांडुरंगाच्या महाराष्ट्रात प्रचाराच्या वारीसाठी आलो याचा आनंद - सुपरस्टार पवनकल्याणजी

पांडुरंगाच्या महाराष्ट्रात प्रचाराच्या वारीसाठी आलो याचा आनंद 
 - सुपरस्टार पवनकल्याणजी 




    लातूर/प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी राजांची ही भूमी आहे. ही संतांची भूमी आहे,ही वीरांची भूमी आहे.या सर्वांना नमन करण्यास मी आलो आहे. पांडुरंगाच्या वारीचा हा महाराष्ट्र आहे.या महाराष्ट्रात प्रचाराच्या वाढीसाठी येता आलं याचा मला आनंद होत आहे,अशा अस्खलित मराठी वाक्यातून बोलत दक्षिणात्य सुपरस्टार, जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी यांनी लातूरकरांची मने जिंकून घेतली.
     लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासाठी पवनकल्याणजी यांनी लातुरमध्ये रोड शो केला. त्यानंतर महात्मा गांधी चौकात आयोजित सभेत पवनकल्याणजी बोलत होते.माजी खासदार अमर साबळे,डॉ.सुनिल गायकवाड, उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर,शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,महिला मोर्चाच्या अध्यक्षा रागिनीताई यादव, गुरुनाथ मगे,शैलेश गोजमगुंडे, दिग्विजय काथवटे,गणेश गोमसाळे,प्रविण कस्तुरे आदींसह मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
     या भूमीला नमन करण्यासाठी मी आलो आहे. लाडक्या बहिणी आणि भावांनाही प्रेमपूर्वक नमस्कार, अशा शब्दात पवनकल्याण यांनी आपले भाषण सुरू केले.मी मराठी भाषेचा सन्मान करतो. त्यामुळे मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहे.माझे उच्चार चुकले तर मला क्षमा करा,असेही पवन कल्याणजी म्हणाले.
      पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा मी आभारी आहे.त्यांनीच मला या भूमीत येण्याची संधी दिली.परंतु फक्त मते मागण्यासाठी मी आलो नाही.वीरांच्या भूमीला नमन करण्यासाठी येथे आलो आहे. छत्रपती शिवरायांच्या या भूमीने लढण्यास शिकवले.मला स्वराज्याचा अर्थ शिकवला. जिजाऊ मातेच्या संस्कारांची ही भूमी आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी आहे. त्यामुळे या भूमीला मी नमन करतो,असेही ते म्हणाले.
       भारतीय जनता पक्ष व स्व.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आणि माझा जनसेना हा पक्ष संपूर्णपणे जनतेसाठी समर्पित आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना भेटणे मला शक्य झाले नाही.पण त्यांच्याकडून मला लढण्याची प्रेरणा मिळाली.आपल्या राज्याच्या हितासोबतच राष्ट्राचेही हित साधले पाहिजे हा सिद्धांत मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो,असा आदरपूर्वक उल्लेख पवन कल्याणजी यांनी केला.
      केंद्रातील सरकारने मागील १० वर्षात राम मंदिर व ३७०  कलम हटवण्यासारखी मोठी कामे केली.भारताचा तिरंगा आज जगात ताठ मानेने उभा आहे.राष्ट्रीय महामार्गाचे जाळे देशभर झाले.सरकारने २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले.शेतकऱ्यांना विविध योजना लागू केल्या.त्यामुळे मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जोडला गेलेला आहे.केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्यातील महायुती सरकार याच विचाराने काम करत आहे. छत्रपती शिवाजी राजांनी आदर्श स्थापित केले,साहस केले त्यामुळे ते प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांची विचारधारा विशेष आहे. महाराष्ट्रधर्म म्हणून ती ओळखली जाते.राज्यातील सरकार शिवरायांच्या विचारावरच चालत असल्याचे पवनकल्याणजी यांनी सांगितले.लातूर तिरूपती विमानसेवा व रेल्वेसाठी प्रयत्न करण्याचे  आश्वासनही त्यांनी दिले.
   माजी खासदार अमर साबळे म्हणाले की,पवन कल्याण हे हिंदुत्वाचा चेहरा आहेत म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना आंधी असे म्हणतात."पवनकल्याण आंधी है,लातूर मे काँग्रेस का सुपडा साफ करना बाकी है", असेही साबळे म्हणाले.
    यावेळी मनोगत व्यक्त करताना उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, लातूरची तरुणाई आणि सामान्य जनता भाजपाच्या मागे उभी आहे.लातूरकरांच्या प्रेमामुळेच नियोजित नसतानाही पवन कल्याणजी यांनी रोड शो केला. हे प्रेम असेच कायम राहू द्या,असे आवाहन करत लातूरहून तिरुपतीसाठी रेल्वे सुरू करून बहिणीला भेट द्यावी,अशी मागणी डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केली.

चौकट...
    उत्साही तरुणांचा जल्लोष... दक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांचे प्रसिद्ध संवाद ऐकण्यासाठी तरूण इच्छुक होते.त्यांच्या गीतांवर ठेका धरणारी तरुणाई असे काही संवाद ऐकण्यासाठी, पवन कल्याणजी यांनी असे संवाद म्हणावेत अशी मागणी वारंवार करत होती.या तरुणांना पवन कल्याणजी यांनीही नाराज केले नाही.भाषणात काही वेळा तेलगू वाक्य उच्चारत त्यांनी तरुणांचा उत्साह द्विगुणित केला.

 जय महाराष्ट्रने सांगता...
    पवन कल्याणजी यांनी संपूर्ण भाषण मराठीत केल्यानंतर 'जय महाराष्ट्र'ने भाषणाची सांगता केली.तरुणांनी आग्रह केल्यामुळे "बाय-बाय अमित" लिहिलेले पोस्टर त्यांनी पुन्हा एकदा हातात घेऊन उंचावले.अर्चनाताईंच्या विजयासाठी बाय-बाय अमित भाई,अमित बाय-बाय असेही ते म्हणाले.
Previous Post Next Post