जिल्हा रुग्णालयासाठी माझं लातूर परिवाराचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाबासाहेब पाटील यांना साकडे निवेदन सादर
लातूर : लातूर जिल्हा रूग्णालय हस्तांतरण निधी वर्ग करून त्वरित भूमिपूजन करावे असे साकडे घालून माझं लातूर परिवाराने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाबासाहेब पाटील यांना निवेदन दिले. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हा बहुचर्चित प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी शासनाने जागा हस्तांतरण करण्यास मंजुरी दिलेली आहे. यासाठी लागणारा मोबदला रुपये ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये कृषी विभागास देण्याची तरतूद देखील केली आहे. मात्र अद्याप यासाठीचा निधी आरोग्य विभागाने कृषी विभागास वर्ग केलेला नाही. हा निधी त्वरीत वर्ग करून लातूरच्या प्रलंबित आणि मंजूर असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन करून लातूरकरांना उपकृत करावे अशी विनंती यावेळी शिष्टमंडळाने केली. हा निधी वर्ग करून ६० दिवसांच्या आत जिल्हा रूग्णालय हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे असा शासन आदेश १९ जून २०२४ रोजी काढण्यात आला आहे. याची मुदत १९ ऑगस्ट २०२४ रोजी संपली आहे.
लातूर जिल्हा रूग्णालय व्हावे यासाठी माझं लातूर परिवाराने निर्णायक लढा दिला आहे. ऐतिहासिक साखळी उपोषण, मंत्रालयात जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालक मंत्री यांना विनंती केली होती.
राज्याचे प्रमुख आणि संवेदनशील, जाणकार उपमुख्यमंत्री, मंत्री म्हणून आपण हा प्रश्न त्वरित मार्गी लागेल यासाठी त्वरीत निर्देश द्यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळात ॲड. बालाजी पांचाळ, विशाल विहिरे, प्रशांत पाटील, बबन भोसले या सदस्यांचा समावेश होता. निवेदनावर परिवारातील ३५ मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही वेळ शिष्टमंडळाने मागितली असून त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येईल. तसेच हा प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढून भूमिपूजन करावे अशी आग्रही विनंती करणार असल्याचे ॲड.बालाजी पांचाळ यांनी सांगितले आहे.
Tags:
LATUR