काम मॅनेज करण्यासाठी चंद्रपुरच्या व्यक्तिचा समावेश..!
लातूर मनपातील 250 कोटींच्या भ्रष्ट कामाची एड. सूरज सोळुंकेंनी केली मुख्य सचिवांकडे तक्रार
लातूर, दि. 22(प्रतिनिधी)-
लातूर शहरातील भूमिगत गटार योजनेच्या टप्पा-2 च्या कामासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाची निविदा दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजी लातूर महानगरपालिकेने प्रसिद्ध केली. दि.6 नोव्हेंबर 2024 रोजी या कामाच्या निविदा भरलेल्या निविदाधारकांचा तांत्रिक लिफाफा उघडण्यात आला. हे काम करण्यासाठी अंकिता कन्सट्रक्शन, . भुगण इनफ्राकोन प्रा. लि., दिनेशचंद्र आर. अग्रवाल इनफ्राकोन प्रा. लि., जयवरुडी इनफ्राकोन प्रा. लि. आणि कालथिया इंजिनियरिंग अँड कन्सट्रक्शन लि. या पाच कंत्राटदानी निविदा भरल्या. मात्र त्यातील अहमदाबादच्या कालथिया इंजिनियरिंग अँड कन्सट्रक्शन लि. या कंत्राटदाराने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसतानाही त्यांनाच हे काम मॅनेज करून देण्यासाठीचे अर्थिक व्यवहार झाले. त्यासाठी चंद्रपुरच्या तयाडे नामक व्यक्तीने पुढाकार घेतला. या निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेली कालथिया इंजिनियरिंग अँड कन्सट्रक्शन लि. हि कंत्राटदार कंपनी ही निविदा भरण्यास तांत्रिक व आर्थिक दृष्टीकोणातून अपात्र आहे . एवढेच नव्हे तर त्यांनी महाराष्ट्रात व ईतर राज्यातील विविध महापालिकेमधील केलेल्या कामाचा पूर्वानुभव हा अत्यंत खराब व सदोषपूर्ण आहे. संबंधित कंपनीने सादर केलेले बहुतांश कागदपत्र देखिल खोटे, चुकीचे व बनावट आहेत. या कंपनीने गुलबर्गा (कलबुर्गी) महानगरपालिकेचे जोडलेले वर्कडन (काम पूर्ण केल्याचे) प्रमाणपत्र 40 कोटीच्या कामाचे असताना या कंत्राटदाराने गुलबर्गा महानगरपालिकेच्या अभियंत्याच्या खोट्या स्वाक्षरी व शिक्क्याचे 140 कोटीचे प्रमाणपत्र जोडले आहे. याची कल्पना असतानाही त्यांच्यावर खोटे कागदपत्रे दिली म्हणून कारवाई करण्याऐवजी लातूर महानगरपालिकेचे प्रशासक व संबंधित विभागप्रमुख व पालिकेतील मुख्य लेखापरिक्षक व अति. आयुक्त यांनी संगनमत करून हे काम याच कंत्राटदार कंपनीस देण्याचा घाट घातला जात आहे.
या गैरप्रकाराबाबत संबंधित विभागाच्या विभाग प्रमुख तथा शहर अभियंत्याकडे विचारणा केली असता आयुक्त मनोहरे यांचा त्याबाबत तोंडी आदेश असल्याचे सांगतिले जात आहे.
भूमिगत गटाराचे हे २५० कोटींचे काम कालथिया इंजिनियरिंग अँड कन्सट्रक्शन लि. या कंत्राटदारासच देण्यासाठी या निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेल्या ईतर कंत्राटदारास तांत्रिक कारण देवून आणि जिओ-टॅग नसल्याचे कारण देवून निविदा प्रक्रियेमधून अपात्र ठरविण्याचा गैरप्रकार केला जात आहे.
त्यामुळे लातूर मनपाकडून राबविण्यात येत असलेली ही निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी. या कामाच्या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी सर्व पात्र कंत्राटदारांना समान संधी उपलब्ध करून द्यावी व तसेच श्री. मनोहरे यांच्या कार्यकाळातील लातूर मनपाद्वारे मागील दोन वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या सर्व निविदे प्रकियेची विशेष समिती नेमून विस्तृत स्वरुपात चौकशी करून नियमबाह्यरित्या राबविण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियामध्ये सहभागी लातूर मनपातील अधिकारी, कर्मचारी व त्रयस्थ व्यक्ती असलेले विकास तायडे यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी एड.सूरज सोळुंके यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे.
Tags:
LATUR