Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे लातूरमध्ये दोन दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे लातूरमध्ये दोन दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशन 
11 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन 


लातूर ;( माध्यम वृत्तसेवा )ज्येष्ठ नागरिक संघ लातूर द्वारा आयोजित महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉन ) चे ३४ वे राज्यस्तरीय अधिवेशन लातूर येथे दि.११ व १२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे ,अशी माहिती फेस्कॉमचेअध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 

        ३४व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे जय्यत तयारी दिवाणजी व श्याम मंगल कार्यालय सावेवाडी येथे करण्यात आली असून ,या नगरीस कै. गुरुशांतप्पा नागप्पा लातूरे सभागृह असेल नाव देण्यात आले आहे .शनिवार दि.११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ ते ९.३० या वेळेमध्ये शोभायात्रा काढण्यात येणार आहे 
ही शोभायात्रा गांधी पुतळा ते मुख्य रस्त्यावरून फिरून अशोक हॉटेल मार्गे दिवाणजी मंगल कार्यालय येथे विसर्जित होईल. सकाळी साडेनऊ वाजता अण्णासाहेब टेकाळे व अरुण रोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. सकाळी १० वाजता मुख्य सभागृहामध्ये या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ तसेच स्वागत अध्यक्ष म्हणून खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे .यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून आमदार रमेश आप्पा कराड ,आमदार विक्रम काळे ,लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे ,लातूर महानगरपालिकेचे उपायुक्त बाबासाहेब मनोहरे ,सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी उपायुक्त अविनाश देवशेटवार यांची उपस्थिती राहणार आहे .यावेळी अध्यक्ष अरुण रोडे ,फेस्कॉमचे विद्यमान अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये *ज्येष्ठांचे आनंदी जीवन* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. सोमनाथ रोडे हे ज्येष्ठांना यावेळी मार्गदर्शन करतील. आर. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. तिसऱ्या सत्रामध्ये *ज्येष्ठत्व ते श्रेष्ठत्व* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. धनंजय गायकवाड हे यावेळी जेष्ठांना मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोकराव तेरकर हे राहणार आहेत. चौथ्या सत्रामध्ये दुपारी ४ वाजता *फेस्कॉम काल आज आणि उद्या* या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे .अरुण रोडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्रामध्ये डॉ.बी. आर. पाटील लातूर, डॉ. सुरेखा देशमुख अमरावती, डॉ. दामोदर थोरात अंबाजोगाई ,मेजर डॉ. निर्मला कोरे नांदेड हे सहभागी होणार आहेत .सायंकाळी *निवृत्ती म्हणजे निष्क्रियता नव्हे* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे .लातूरातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. मायाताई कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून माहिती व जनसंपर्क विभागाचे माजी संचालक तथा लेखक देवेंद्र भुजबळ हे प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठांना मार्गदर्शन करणार आहेत. *आरोग्यमय जीवन कसे जगावे* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. एन.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून मिलिंद सरदार, माधवबाग हे ज्येष्ठांना मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
          रविवार दिनांक १२ जानेवारी२०२५ रोजी सकाळच्या सत्रामध्ये *हृदयरोग व घ्यावयाची काळजी* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉक्.संजय शिवपुजे यावेळी *ज्येष्ठांनी हृदयरोग व हृदयरोगाची काळजी कशी घ्यावी ?*याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. डॉ.राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे व्याख्यान होईल. फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या चर्चासत्रामध्ये *फेस्कॉम कार्याची भावी दिशा व वाटचाल* या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे .तसेच *ज्येष्ठांच्या कायदेविषयक समस्या* या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये जिल्हा विधी प्राधिकरण न्यायमूर्ती किर्तीकर हे व्याख्यान देणार आहेत .*ज्येष्ठांचे आरोग्य* या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये लातूरातील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. चंद्रशेखर अष्टेकर ,श्वसन विकार तज्ञ डॉ. रमेश भराटे हे ज्येष्ठांना मार्गदर्शन करणार आहेत .तसेच *महिलांच्या कर्करोग समस्या* या विषयावर लातूर येथील ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. मायाताई कुलकर्णी या महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका यांच्या अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र होणार आहे. 
रविवारी या अधिवेशनाचा समारोप होणार आहे. 
 
   महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी ज्येष्ठांना कोणकोणत्या सवलती दिल्या याचा आढावा या पत्रकार परिषदेत बोलताना घेतला .ते म्हणाले की, जेष्ठ नागरिक यांना सर्वात जास्त सोयी सवलती देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे .सरकारने असे निर्णय घ्यावेत यासाठी फेस्कॉमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, मान्यवरांनी आपल्याला याविषयी मदत करून मार्गदर्शन केले असल्याबद्दल त्यांनी या सर्वांचे आभार मानले .या अधिवेशनामध्ये ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात असलेली ५० टक्के सवलत पुन्हा सुरू करणे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र दिले आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात ज्येष्ठ नागरिकांना अनुक्रमे ३००० ते ४००० रुपये पालन पोषण भत्ता म्हणून दिला जातो हीच योजना महाराष्ट्र सरकारने सुरू करावी आणि त्यासाठी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना सरसकट किमान ३००० रुपये मिळावेत यासाठी प्रयत्न करावेत, ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळावर फेस्कॉम या संघटनेला ५०टक्के प्रतिनिधित्व मिळावे असा आग्रह धरावा, देवदर्शन सुलभ व्हावे म्हणून देवस्थान ट्रस्ट शिर्डी , प्रभादेवी येथे फेस्कॉमचे प्रतिनिधित्व द्यावे , केंद्र सरकारचे आर्थिक लाभ मिळविण्यासाठी ६५ वयाची अट रद्द करून ती ६० करावी ,तसेच एसटी प्रवासात देखील ६० वर्षापासून सवलत देण्यात यावी कारण निवृत्तीनंतर ६० ते ६५ हा काळ कठीण असतो हा टप्पा पार केला मग बिनधास्त ज्येष्ठ नागरिक ७५ च्या पुढे जातो. ग्रामपंचायत पासून ते महापालिकेच्या ज्येष्ठांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन ऐवजी पाच टक्के तरतूद करावी ,जेष्ठ नागरिकांना अडचणीच्या वेळी तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी (गोल्डन आवर हॉस्पिटल ऑन व्हील )ही सेवा राज्यभर सुरू करावी, गाव पातळीपर्यंत विरंगुळा केंद्र सरकारने उभी करावी अशा काही प्रमुख मागण्या या अधिवेशनामध्ये करण्यात येणार आहेत. 
या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण रोडे तसेच डॉ. बी. आर. पाटील ,प्रकाश घादगिने ,डॉ. सी. एन. जोशी ,आर. बी. जोशी, विवेक देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Previous Post Next Post