मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय संमेलनाची उत्साहात सांगता
मुख्याध्यापक - शिक्षकांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांची
सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील राहू : खा. डॉ. काळगे
लातूर : शिक्षकांमुळे आपले जीवन घडत असते. शिक्षक - मुख्याध्यापकांच्या अनेक न्याय मागण्या मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या सर्व मागण्या, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहू,अशी ग्वाही खा. डॉ. शिवाजी काळगे यांनी मुख्याध्यापकांच्या ६१ व्या राज्यस्तरीय संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना दिली.
अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे व लातूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या ६१ व्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाची सांगता शनिवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात झाली. समारोप प्रसंगी खा. डॉ. शिवाजी काळगे , शिक्षक आमदार विक्रम काळे, के.एस. ढोमसे, वसंतराव पाटील, मारोती खेडेकर, मोहन सोनवणे, बजरंग चोले यांच्यासह मुख्याध्यापक संघाचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खा. डॉ. शिवाजी काळगे यांनी शिक्षकांमुळेच आम्ही घडलो, शिक्षकांमुळेच उज्वल पिढी घडत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात त्याकाळी अनेक कुटुंबातील आई वडील फारसे शिक्षित नसल्याने त्यांच्यानंतर मुलांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच येत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षक - मुख्याध्यापकांचा वाटा मोठा असायचा. आज शिक्षण क्षेत्र खूपच प्रगत झाले आहे. शिक्षणाचे अनेक माध्यम , पर्याय उपलब्ध आहेत. तरीही शिक्षकांचे स्थान कायम अबाधित आहे. विद्यादानाने पिढी घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षक - मुख्याध्यापकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही खा. डॉ. काळगे यांनी यावेळी दिली. लातुरात पार पडलेले हे शैक्षणिक संमेलन उत्कृष्ट नियोजनामुळे अपेक्षेपेक्षाही अधिक यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले. आ. विक्रम काळे यांनी यावेळी बोलताना बदलत्या परिस्थितीत आता धावते जग झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारची अधिवेशने, संमेलने फक्त एकच दिवस व्हायला हवीत म्हणजे संमेलनास उपस्थित असलेले सगळे लोक मोठ्या संख्येने हजर राहतील, असे मत व्यक्त केले. संमेलनाच्या आयोजनात प्रचंड खर्च, परिश्रम करूनही अशी स्थिती निर्माण होत असेल तर योग्य विचार होणे आवश्यक आहे. लातूर पॅटर्नची माहिती राज्यभरातील मुख्याध्यापकांना व्हावी या उद्देशाने लातुरात आलेल्या सर्व मुख्याध्यापकांचे आपण शिक्षक आमदार या नात्याने स्वागत करतो असे त्यांनी सांगितले. संयोजकांनी लातूरच्या दैदिप्यमान परंपरेला साजेल अशी भोजन, निवास व्यवस्था चोख केल्याबद्दल संयोजन समितीचे त्यांनी कौतुक केले. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नूतन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करून या संमेलनात मांडलेले ठराव मंजूर करून घेऊ,असे आश्वासन त्यांनी दिले. शिक्षक - मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे बघावे, बाकीचे सगळे मी बघून घेतो. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत शाळेत आलेला विद्यार्थीही टिकला पाहिजे, यासाठी शिक्षक - मुख्याध्यापकांनी प्रयत्नशील रहावे . सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आ. काळे यांनी संगितले.
लातुरात दोन दिवस चाललेल्या या राज्यस्तरीय संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संयुक्त अध्यक्ष रावसाहेब आवारी, वसंतराव पाटील,अध्यक्ष के.एस. डोमसे , कार्याध्यक्ष मोहन सोनवणे , राज्य उपाध्यक्ष प्रकाश देशमुख, नंदकुमार बारवकर, शत्रुघ्न बिरकड, अशोक मोरे, मराठवाडा अध्यक्ष संजय शिप्परकर , उपाध्यक्ष देविदास उमाटे, कांचन महाजन, नामदेव सोनवणे, सचिव जालिंदर पैठणे, विदर्भ अध्यक्ष सतीश जगताप, उपाध्यक्ष मंदा उमाटे, विनोद संगीतराव, सचिव विलास भारसाकळे, सचिव बजरंग चोले , कोषाध्यक्ष शिवराज म्हेत्रे, प्रवक्ते कालिदास शेळके, उपाध्यक्ष रमेश मदरसे, सचिन साबणे, उमेश पाटील, श्रीमती जयश्री ढवळे , मार्गदर्शक दिलीप धुमाळ, धनराज चिद्रे , सुवर्णा जाधव, दत्तात्रय पारवे ,अनिल कारभारी, रामेश्वर कदम, बालाजी मुंडे, एस.व्ही. मादलापूरे, परवेजखान पठाण, विशाल पात्रे , जयश्री पाटील आदीनी परिश्रम घेतले
Tags:
LATUR