शाळकरी मुलाची निघृण हत्या करुन सोयाबीनच्या ढिगाऱ्यात मृतदेह लपवला:भादा पोलिसात गुन्हा
: नातेवाइकांचा ठिय्या; दोघा मित्रांवर संशय, एक ताब्यात
![]() |
मयत- रितेश रविन्द्र गिरी |
उजनी (जि. लातूर) : औसा तालुक्यातील कमालपूर शिवारात रितेश रवींद्र गिरी (वय १४) या शाळकरी मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली. याप्रकरणी दोघा मित्रांवर संशय असून, एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार कमालपूर येथे शनिवार, ११ जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन मित्र रोजच्याप्रमाणे एकत्र आले. ते विजया विठ्ठल गिरी यांच्या शेतात गेले होते. दरम्यान, रितेश रवींद्र गिरी हाही या मुलासोबत गेला होता. रात्र झाली तरी रितेश हा घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी रात्रभर शोध घेतला असता, तो आढळून आला नाही. अखेर कुटुंबीयांनी सोबत असलेल्या मित्रांपैकी एकाला दरडावून विचारणा केली असता त्याने घटनेची माहिती देताना सांगितले की, रितेश गिरी याला आम्हीच जिवे मारून त्याचा मृतदेह सोयाबीनच्या ढिगाऱ्याखाली पुरला आहे. हे ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी विजया गिरी यांच्या शेतातील सोयाबीनच्या ढिगाऱ्याकडे
धाव घेतली. भादा पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सोयाबीनचा ढिगारा बाजूला केल्यानंतर रितेश गिरी या
शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत.
उजनी आरोग्य केंद्रात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी आक्रोश करीत गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी आरोग्य केंद्रातच ठिय्या मांडला. शिवाय, भादा पोलिस ठाण्याचे सपोनि, राहुलकुमार भोळ यांना घेरावही घातला. याबाबत रविवारी रात्री भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भादा पोलिस ठाण्याचे सपोनि. राहुलकुमार भोळ यांना घेरावही घातला.
कमालपूर, उजनीमध्ये बंदोबस्त वाढविला
घटनेचे गांभीर्य ओळखून कमालपूर आणि उजनी आरोग्य केंद्रात राज्य राखीव दलाच्या तुकड्या, भादा ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय, औसा डीवायएसपी कुमार चौधरी यांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली.
तपासानंतरच उलगडा
कमालपूर येथील १४ वर्षीय शाळकरी मुलाचा खून करण्यात आला असून, यातील संशयित मित्रांपैकी एकाला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. खून नेमक्या कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा पोलिस शोध घेत आहेत. तपासानंतरच
कारणांचा उलगडा होणार आहे. - सोमय मुड़े, पोलिस अधीक्षक, लातूर
पोलिस बंदोबस्तामध्ये करण्यात आले अंत्यस्कार
कमालपूर येथील १४ वर्षीय मुलाच्या पार्थिवावर पोलिस बंदोबस्तामध्ये रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेह सोयाबीनच्या ढिगाऱ्यात आढळल्यापासून कमालपूरसह उजनी येथे आरोग्य केंद्र परिसरात तणावाचे वातावरण होते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि स्थानिक पोलिसांची कुमक वाढविण्यात आली होती. भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Tags:
LATUR