Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर

बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर

*जिल्ह्यातील कुक्कुटपालकांमध्ये बर्ड फ्ल्यूविषयी जनजागृती करा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*
• उपविभाग, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक
• नागरिकांनी भीती न बाळगता सतर्क राहण्याचे आवाहन



लातूर, दि. २९ : उदगीरमधील रामनगर परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे अहवाल बर्ड फ्ल्यूसाठी सकारात्मक आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावले उचलत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी आज जिल्ह्यातील उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. तसेचे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांची संबंधित तहसीलदार यांनी बैठक घ्यावी. त्यांना बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी भूपेंद्र बोधनकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

उदगीरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापरिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात इतरत्र बर्ड फ्ल्यूचा प्रसार होवू नये, यासाठी कुक्कुटपालकांमध्ये जनजागृती करण्यावर भर द्यावा. काय करावे, काय करू नये याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे. यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर संबंधित तहसीलदार यांच्या उपस्थितीत कुक्कुटपालकांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत.

बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यानुसार सर्वांनी समन्वयाने काम करावे. या कामामध्ये आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घेतली जावी. जिल्ह्यात कुठेही पशुपक्ष्यांमध्ये असाधारण मरतुक आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागाने तातडीने दखल घेवून पुढील कार्यवाही सुरु करावी. यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

पशुसंवर्धन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कुक्कुट पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी यावेळी दिल्या. तसेच जैवसुरक्षा, पोल्ट्री फार्मचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत कुक्कुटपालकांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले.

*नागरिकांनी भीती न बाळगता प्रशासनाला सहकार्य करावे*

बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर न ठेवता, भीती न बाळगता सतर्क रहावे. जिल्ह्यात कुठेही पक्ष्यांची असाधारण मरतुक आढळल्यास पशुसंवर्धन विभागाला किंवा १९६२ या टोल क्रमांकावर तातडीने माहिती द्यावी. प्रतिबंधित क्षेत्र आणि अलर्ट झोनमध्ये देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

*रामनगरच्या एक किलोमीटर परिसरात प्रतिबंधित क्षेत्र; प्रादुर्भाव क्षेत्रात निर्जंतुकीकरण*

बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळलेल्या रामनगरच्या एक किलोमीटर परिघात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी पशुपक्ष्यांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच या परिसरातील ४१ कुक्कुट पक्षी, अंडी व पक्षी खाद्याची तातडीने शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली असून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच १० किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

*पोल्ट्री फार्म, घरगुती कुक्कुटपालनाची पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी बंधनकारक* 

जिल्ह्यातील सर्व पोल्ट्री फार्मची नोंदणी पशुसंवर्धन विभागाकडे करण्याचे यापूर्वीच आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच घरगुती कुक्कुट पालनामध्ये ५० पेक्षा अधिक पक्षी असल्यास त्यांचीही नोंदणी बंधनकारक आहे. नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात ही नोंदणी करता येईल, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी सांगितले.

*चिकन व अंड्याचे सेवन सुरक्षित*

पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, चिकन आणि अंडी व्यवस्थित शिजवून खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा धोका नाही. बर्ड फ्लूचा विषाणू उष्णतेला संवेदनशील असल्याने 70 डिग्री सेल्सियस किंवा त्याहून अधिक तापमानावर तो नष्ट होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य स्वच्छता पाळून चिकन आणि अंडी सेवन करणे सुरक्षित असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी सांगितले.
*****
Previous Post Next Post