शासनाच्या नियमांना केराची टोपली- प्रा. मकबूल शेख
नियमबाह्य सेवा समाप्तीच्या निषेधार्थ शाहू महाविद्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
लातूर/ प्रतिनिधी: राजर्षी शाहू महाविद्यालयाने नियमबाह्य पद्धतीने सेवा समाप्ती केल्यामुळे प्रा. यशवंत काशिनाथ जोपळे या शिक्षकाने शाहू महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सेवेत कायम केल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे प्रा. जोपळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.या प्रकरणी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम संस्था करत असल्याचे मुपटा संघटनेचे प्रा. मकबूल शेख यांनी सांगितले.
प्रा.जोपळे यांनी सोमवार दि. 3 पासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिक्षकांच्या मुपटा या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना संघटनेचे विभागीय अध्यक्ष मकबूल शेख यांनी सांगितले की,3 वर्षांपूर्वी शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जोपळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. 33 महिन्यांच्या सेवेनंतर शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गवारे यांनी त्यांना सेवामुक्त केले. अध्यापनात दोष दाखवत त्यांना सेवामुक्त करण्यात आले.मुळात एखाद्या शिक्षकाला सेवामुक्त करण्यासाठी समिती नेमावी लागते. तशी कुठलीही समिती या प्रकरणात नेमण्यात आलेली नाही. 33 महिने काम झाल्यानंतर सेवामुक्तीचे पत्र दिले गेले. विशेष म्हणजे प्रा. जोपळे यांच्यासमवेत रुजू झालेल्या इतर पाच जणांना मात्र सेवेत कायम करून घेण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षक आणि संघटनेने संस्था अध्यक्ष डॉ.गोपाळराव पाटील सचिव अनिरुद्ध जाधव तसेच शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन पत्रव्यवहारही केला. शिक्षण उप संचालकांनी त्यांना रुजू करून घेण्याचे पत्र दिले आहे. परंतु संस्थेने त्या पत्राला केराची टोपली दाखवली. काही दिवसांनी संस्था अध्यक्ष व सचिवांनी त्यांना पुन्हा एकदा सेवामुक्त करण्याचे पत्र दिले आहे. शासनाचे नियम पायदळी तुडवत संस्था नियमाबाह्य पद्धतीने वागत आहे. त्यामुळे याप्रकरणी आदिवासी प्राध्यापक यशवंत जोपळे यांना न्याय मिळेपर्यंत संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचेही मकबूल शेख यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस आदिवासी संघटनेचे रामराजे अत्राम, उर्दू मुपटा संघटनेचे अफसर सय्यद ,फुरकान उस्मानी, बलभीम सातपुते, शिवशरण हावळे,प्रा.प्रकाश कांबळे, प्रा. बाबासाहेब कांबळे, किशन कांबळे, आसिफ पटेल, मुजम्मील पठाण व पदाधिकाऱ्याची उपस्थिती होती.
Tags:
LATUR