कर्तव्यनिष्ठा कायम मात्र एका जबाबदारीचा प्रवास आज थांबवतोय!
श्रीशैल उटगे यांनी दिला काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
वयाच्या 18व्या वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या सेवेत कार्यरत राहण्याचा मान मिळाला आणि पक्षासाठी झोकून देण्याची संधी मिळाली. अशातच 20 जून 2020 रोजी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हापासून आजपर्यंतचा हा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला राहिला. काँग्रेस पक्षाशी असलेली निष्ठा आणि जनसेवेची तळमळ यामुळे हा संपूर्ण कालखंड माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.
या प्रवासात शेतकरी, मजूर, व्यापारी, समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी विविध आंदोलने, संघर्ष, उपोषण, चक्काजाम करून प्रशासनापर्यंत न्याय मागण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
सतत संघर्षशील राहून पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. हा प्रवास सहजसोप्या वाटेने नक्कीच नव्हता, पण मला माझ्या स्नेही, सहकारी, कष्टाळू कार्यकर्ते, मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेतृत्वाचा आधारमिळाला, त्यामुळे हे आव्हान मोठ्या जिद्दीने पेलता आले.
काँग्रेस पक्षाने आणि पक्षातील नेतृत्वाने मला भरभरून दिले. त्यामुळे आज हा राजीनामा देताना कोणतीही खंत नाही, तर एक आनंद आहे की, हा पदभार निभावताना पक्षाच्या विचारांना समर्पित राहिलो.
या राजीनाम्यामागे एकच भावना आहे – नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी! पक्षात नव्या ऊर्जेने, नव्या विचारांनी काम करण्यासाठी नवीन नेतृत्वाला संधी देणे हे माझे कर्तव्य आहे. पद सोडले तरी जबाबदारी सोडलेली नाही.
आजही, उद्याही लातूर जिल्ह्यातील माझ्या स्नेही कार्यकर्त्यांसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी मी सदैव उपलब्ध असेन.या प्रवासातील प्रत्येक सहकाऱ्याचे मनःपूर्वक आभार!काँग्रेस विचारधारेसाठी झोकून देण्याची तयारी सदैव कायम राहील!
आपलाच,
श्रीशैल उटगे.